आयुष्य एकदाच मिळते. क्षणात होत्याचे नव्हते होते. थोडावेळ दम धरला असता, तर बिघडले असते का, अशी खंडीभर वाक्य, म्हणी एखादा अचानक आपल्याला सोडून गेला की आपण उच्चारतो. मात्र, त्यापासून धडा कोणीच घेत नाही. नेमके असेच सांगलीमध्ये घडल्याचे समोर आले आहे. येथे महापालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना एका वयोवृद्ध आजीने लिफ्ट मागितली. तेव्हा त्यांना लिफ्ट देण्याचे काम या कर्मचाऱ्यांनी केले. मात्र, त्या आजीला ज्या पद्धतीने आणले, त्यामुळे आजीही भेदरून गेल्या असतील. कशाला घेतली लिफ्ट असा प्रश्न त्यांना त्यावेळी पडलाही असेल. असे कोणाबाबतीतही होऊ शकते. त्यामुळे नेमके झाले काय, ते तुम्हीही घ्या जाणून.
सांगली जवळच्या मिरजमध्ये एक वयोवृद्ध आजी उभ्या होत्या. त्यांना सांगली येथील विजयगरमध्ये जायचे होते. मात्र, बराच वेळापासून त्यांना वाहन मिळत नव्हते. तेव्हा मिरजेतील एक घंटागाडी चालल्याचे त्यांना दिसले. त्यांनी या कर्मचाऱ्यांना विनंती केली. कर्मचाऱ्यांनीही आजींचे वय पाहून त्यांना लिफ्ट द्यायची तयारी दर्शवली. आजीला घंटागाडीमागील बाजूस बसायला सांगितले. मात्र, आजीचा तो प्रवास अक्षरशः धक्कादायक झाला. त्यामुळे आजींनासुद्धा उगीच या वाहनात बसले आणि लिफ्ट मागितली असे झाले असेल. या कर्मचाऱ्यांना रस्त्यावरील इतरांनीही समजावले. मात्र, ते काही ऐकले नाहीत.
मिरजेतून घंटागाडीत बसलेल्या आजींना अतिशय धोकादायक प्रवास करावा लागला. त्याचे चित्र पाहून कोणीही हैराण होऊन जाईल. एक तर चालकाने गाडीचा वेग सुसाट ठेवलेला. त्यात आजी मागे एका बाजूला अक्षरशः लटकलेल्या परिस्थितीत होत्या. त्यांचा हात सुटला असता, तर अनर्थच ओढवला असता. हा प्रकार मिरज-सांगली हायवेवरच्या अनेकांना खटकला. त्यांनी चालकाला गाडी थांबवून तसे सांगितलेही. मात्र, त्याने हे गांभीर्याने तर घेतलेच नाही. शिवाय आपल्या वाहनाचा वेगही कमी केले नसल्याचे समोर आले आहे. या जीवघेण्या प्रवासाचा इतरांनी व्हिडिओ केला असून, तो पाहून कोणालाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.