राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. ”माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण चिंता करण्याचे कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी.” असे शरद पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे.
याआधी राज्यातील सुमारे १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली होती. अधिवेशन कालावधीत अवघ्या पाच दिवसांत २० आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.
दरम्यान, देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ लाख ६ हजार ६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याआधीच्या दिवशीच्या तुलनेत ही रुग्णसंख्या २७ हजार ४६९ ने कमी आहे. देशात सध्या कोरोनाचे २२ लाख ४९ हजार ३३५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत २ लाख ४३ हजार ४९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट २०.७५ टक्के आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ७१.६९ कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर गेल्या २४ तासांत १४ लाख ७४ हजार ७५३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर रिकव्हरी रेट ९३.०७ टक्क्यांवर घसरला आहे.