कवलापूर (ता. मिरज) येथील लाखो रुपये किमतीची 81 गुंठे जमिनीची बोगस दस्ताद्वारे विक्रीचा प्रयत्न करणार्या पाच जणांना गुरुवारी चांगलाच चोप देण्यात आला. त्यांना पकडून सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सलीम बाबू मुलाणी (वय 55, रा. बुवाची वठार, हातकणंगले), अक्षय अनिल शिंदे (वय 28, रा. यशवंतनगर, सांगली), राहुल काशीद गंगाधर (वय 38, रा. कुपवाड), विजय राजाराम माने (वय 29, रा. कुपवाड) व मनोज दशरथ निकम (वय 32, रा. इचलकरंजी)अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले, निवृत्ती सीताराम हरगुडे ( रा. सांगलीवाडी) यांची कवलापूर हद्दीमध्ये 81 गुंठे जमीन आहे. या जमिनीचा खरेदी व्यवहार होणार होता. त्यासाठी संशयित आरोपींनी संगनमताने बनावट आधार कार्ड, ओळखपत्र व सातबारा उतारा तयार केला होता. हा दस्त नोंदवण्यासाठी त्यांनी सांगली येथील एका मुद्रांक विक्रेत्याकडे काम दिले होते. त्या मुद्रांक विक्रेत्याला या दस्तामध्ये व ओळखपत्रांमधील फोटोविषयी संशय आला. त्याने त्याच्या ओळखीचे असलेले व फिर्यादीचे मेहुणे असलेले राजाराम शंकर पाटील यांना संपर्क करून याबाबत कल्पना दिली.