चार महिन्यांपूर्वी कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज घाटात अवधूत सोपान शिंदे (वय 29, रा. धामणी, ता. तासगाव) या युवकाचा खून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पैसे घेऊनही गुप्तधन शोधले नाही म्हणून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
आनंदराव आत्माराम पाटील (वय 57, रा. पाडळी, ता. तासगाव), तुषार बाळू कुंभार (वय 28, रा. घोटी खुर्द, ता. तासगाव), लखन ठोंबरे (रा. पंचशीलनगर, विटा), वैभव नेताजी सकट, अमोल विठ्ठल कारंडे (दोघेही रा. आंबवडे, ता. खटाव, जि. सातारा) व अण्णा (पूर्ण नाव समजू शकले नाही) या सहा जणांविरोधात कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदराव पाटील, तुषार कुंभार व अमोल कारंडे या तिघांना अटक करून पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
अवधूतचा खून करून अपघात झाल्याचा बनाव करण्यासाठी त्याचा मृतदेह व मोटारसायकल नागज घाटात टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. गुप्तधन शोधण्यासाठी संशयित आनंदराव पाटील यांच्याकडून व इतरांकडून पैसे व सोने घेतले होते. परंतु गुप्तधन न शोधले नाही आणि पैसेही देत नसल्याच्या कारणावरून त्याचा खून केला असल्याचे संशयित आरोपींनी कबूल केले आहे.