रशिया-युक्रेन युद्धाने जगाला धडकी भरवली आहे. ही तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी होऊ नये, अशी आशा सारेच करतायत. रशियाने युक्रेनवर सुरू केलेले हल्ले अजून तरी थांबवले नाहीत. त्यामुळे अनेक देशवासीय युक्रेन सोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत. तर दुसरीकडे नाशिक येथील दोन विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याचे समोर आले आहे. हे दोघेही विद्यार्थी गंगापूर रोडचे रहिवासी आहेत. त्यांचे सध्या युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण सुरू असल्याचे समजते. या विद्यार्थ्यांना मायदेशी आणावे, अशी साद त्यांच्या कुटुंबांनी घातलीय. तर जिल्हाधिकारी आणि प्रशासनानेही त्यांना भारतात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत.
नाशिकची आदिती देशमुखआणि प्रतीक जोंधळे हे विद्यार्थी युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. खर्कीव्ह प्रांतातील हॉस्टेलमध्ये ते राहतात. त्यांच्यासोबत इतरही भारतीय विद्यार्थी आहेत. रशियाने गुरुवारपासून युक्रेनवर हल्ला सुरू केल्याने इथल्या विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बेसमेंटमध्ये आश्रय घेतला आहे. त्यांचे त्यांच्या कुटुंबाशी बोलणे झाले आहे. त्यामुळेच या कुटुंबांनी या दोन्ही विद्यार्थ्यांना तातडीने भारतात आणावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.