बारावी परीक्षेत (HSC) रसायन शास्त्राचा पेपर फुटल्याची घटना ताजी असतानाच आता दहावी परीक्षेच्या हॉलतिकीटसाठी विद्यार्थ्याकडे 30 हजार रुपयांची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी औरंगाबादमधील एका संस्था चालकाला अटक केली आहे. आजपासून इयत्ता 10वीची परीक्षा सुरु झाली आहे. मात्र परीक्षेआधी घडलेल्या या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्याची अडवणूक करून लाच मागणाऱ्या या संस्थाचालकाविरुद्ध सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर तब्बल दोन वर्षांनी दहावीची ऑफलाईन परीक्षा सुरु झाली आहे. ही परीक्षा सुरळीत पार पडेल असे वाटत असतानाच औरंगाबादमध्ये शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कलावतीदेवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एस.पी. जवळकर यांनी एका विद्यार्थ्याकडे हॉलतिकीट आणि परीक्षेत मदत करण्यासाठी 30 हजार रुपयांची मागणी केली आहे. दरम्यान यातील 10 हजार रुपये स्वीकारताना पोलिसांनी त्यांना रंगेहात अटक केली आहे. यामध्ये शाळेतील लिपिक सविता खामगावकर देखील सहभागी असून त्यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.