लातूरमध्ये महिला पोलिसाचा रुद्रावतार पाहायला मिळाला. दहशत निर्माण करणा-या गुंडाला या महिला पोलिसानं चांगलाच पोलिसी खाक्या दाखवला.
शहरातील तरुणींची छेड काढण्याऱ्याला महिला पोलिसाने तुफान चोप दिला आहे. या गुन्हेगाराची पोलीस स्टेशनपर्यंत धिंड काढण्यात आली. शहरातल्या विवेकानंद पोलीस ठाण्याअंतर्गत येणा-या भागात गौस मुस्तफा सय्यद हा सराईत गुन्हेगार दहशत निर्माण करत होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात 18 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
14 मार्चलाही एका अल्पवयीन मुलीला त्यानं मारहाण करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मुलीनं पोलीस ठाण्यात रितसर तक्रार केली. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी या गुंडाला ताब्यात घेतलं.
मात्र या गुंडाला पोलिसांच्या गाडीतून न नेता त्याची धिंड काढून नेण्यात आलं. यावेळी विवेकानंद पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचाऱ्याने या कारवाईचा पुढाकार घेतला होता.