यास्तिका भाटियाने फटकावलेले अर्धशतक आणि त्यानंतर स्नेह राणा (४ बळी), झुलन गोस्वामी (२), वस्त्रकार (२) यांनी केलेल्या भेदक मार्याच्या जोरावर भारताने बांगलादेशला ११० धावांनी मात देत पराभवाची धुळ चारली. या दणदणीत विजयानंतर टीम इंडियाच्या नेट-रनरेटमध्ये मोठा फायदा झाला आहे. संघाने गुणतालिकेत तिस-या क्रमांकावर झेप घेतली असून, स्पर्धेची सेमीफायनल गाठण्याच्या आशा कायम राहिल्या आहेत. या सामन्यात भारताने पूर्णपणे वर्चस्व राखत प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ गडी गमावून २२९ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ ४०.३ षटकांत ११९ धावांत गारद झाला. भारताच्या यास्तिका भाटियाला तिच्या शानदार अर्धशतकासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
भारतीय कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्य ठरला. भारताच्या दोन्ही सलामीवीर शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. मात्र, यानंतर पुढील पाच चेंडूंत संघाने तीन विकेट गमावल्या. मंधाना ३० धावा करून बाद झाली. दुसरीकडे, शेफाली वर्मा ४२ आणि मिताली राज खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतल्या. हरमनप्रीतही १४ धावा करून धावबाद झाली. यावेळी संघाची धावसंख्या ४ बाद १०८ अशी अवस्था झाली. यानंतर भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली. मात्र. यास्तिका भाटिया आणि ऋचा घोष यांनी डाव सावरला. दोघींनी पाचव्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. रिचा २६ धावा करून बाद झाली. त्यानंतर यास्तिका आपले अर्धशतक (५०) पूर्ण करून करून माघारी परतली. खालच्या क्रमवारीत पूजा वस्त्राकरने नाबाद ३० आणि स्नेह राणाने २७ धावा केल्या. अशा प्रकारे संपूर्ण षटके खेळताना भारतीय संघाने ७ बाद २२९ धावा केल्या. बांगलादेशकडून रितू मोनीने ३ बळी घेतले.
२३० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डावाला भारतीय गोलंदाजांनी सुरुंग लावला. अवघ्या ३५ धावांतच बांगलादेशच्या निम्म्या संघाला तंबूत धाडले. शर्मीन अख्तर, फरगाना हक, निगार सुलताना, मुर्शिदा खातून, रुमाना अहमद यांनी मैदानावर फक्त हजेरी लावली. या अव्वल ५ फलंदाजांपैकी फक्त मुर्शिदाच दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकली आणि ती १९ धावा करून बाद झाली. सहाव्या विकेटसाठी लता मंडल आणि सलमा खातून यांनी थोडा वेळ संघर्ष करत ४० धावा जोडल्या. सलमा खातूनने सर्वाधिक ३२ धावा केल्या, तर लताने २४ धावांचे योगदान दिले. शेवटची विकेट म्हणून रितू मोनी १६ धावांवर बाद झाली. अशाप्रकारे बांगलादेशचा संपूर्ण संघ ४०.३ षटकांत ११९ धावांतच गारद झाला.
टीम इंडियाचा बांगलादेशविरोधातील हा सलग पाचवा विजय आहे. आता २७ मार्च रोजी दक्षिण अफ्रिकेविरोधात सामन्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. बांगलादेशविरोधातील विजयामुळे सेमीफायनलमध्ये जाण्याचा भारताचा मार्ग सुकर झाला आहे.