पन्हाळा येथील तहसिलदार कार्यालयानजीक असणाऱ्या ऐतिहासिक सोमेश्वर तलावात एका व्यक्तीचा पाय घसरुन पाण्यात पडल्याने बुडून मृत्यु झाल्याची घटना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.या घटनेची नोंद पन्हाळा पोलीस ठाण्यात झाली असून शामराव हरी मोरे (वय 54 रा. नेबापूर ता.पन्हाळा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची वर्दी पन्हाळा नगरपरिषदेचे मुकादम जयवंत भगवान कांबळे (वय 52 रा.पन्हाळा) यांनी पोलिसांत दिली.
या बाबत घटनास्थळावरुन व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, शामराव मोरे हे पन्हाळा येथे एका खाजगी बंगल्यावर कामाला होते. आज सोमेश्वर तलाव येथे ते गेले होते. तलावाच्या काठवर पायऱ्या असून या पायाऱ्या शेवाळलेल्या आहेत. या पायऱ्यावरुन त्यांचा पाय घसरल्याने मोरे हे पाण्यात पडले. त्यांना पोहता येत नआल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तलावाच्या दक्षिण काठाला मोरे यांचा सीहूआप सपासच्या परिसरातील नागरिकांना दिसला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाण्यातून मोरे यांचा मृतदेह बाहेर काढून मोरे यांच्या कुटुंबियांना यांची माहिती कळवली. ज्या ठिकाणाहून मोरे यांच्या पाय घसरला त्याठिकाणी त्यांचे मोबाईल व चप्पल सापडले आहे.
मोरे यांना पोहता येत नव्हते, त्यामुळे पाय घसरुन पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाकडे पाठविला आहे.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांची घटनास्थळी एकच गर्दी जमली होती. दरम्यान ही आत्महत्या तर नसावी, या बाबत नागरिकांच्यात चर्चा सुरु होती. शामराव मोरे यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश ठाणेकर करत आहेत.