Monday, December 23, 2024
Homeराजकीय घडामोडीब्रेकिंग : भोंग्याबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, सर्वपक्षीय बैठकीत काय ठरलं?

ब्रेकिंग : भोंग्याबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, सर्वपक्षीय बैठकीत काय ठरलं?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे न काढल्यास त्यासमोर ‘हनुमान चालीसा’ लावण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी ठाकरे सरकारला 3 मेपर्यंतचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे..
भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यात चिघळलेल्या परिस्थितीवर उपाय काढण्यासाठी राज्य सरकारने आज (ता. 25) सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका मांडली.

मंत्री वळसे पाटील म्हणाले, की “सर्वोच्च न्यायालयानं ध्वनी प्रदुषणासंदर्भात 2005 मध्ये आदेश दिला. तसेच अन्य काही न्यायालयांच्या निर्णयाच्या आधारे महाराष्ट्र सरकारने 2015 ते 2017 या कालावधीत काही ‘जीआर’ काढले. त्यानुसार लाऊडस्पीकरचा वापर, त्याला द्यायची परवानगी, अटी, शर्थी, वेळ आणि आवाजाची मर्यादा स्पष्ट केल्या आहेत..”
“राज्य सरकारच्या निर्णयाच्या आधारे राज्यात लाऊडस्पीकरचा वापर करता येतो. गेल्या काही दिवसांत लाऊडस्पीकर वापराबाबत इशारे दिले जात आहेत, पण सरकार भोंग्यासंदर्भात काहीही निर्णय घेऊ शकत नाही. ज्यांनी भोंगे लावलेत, वापर करीत आहेत, त्यांनीच आता विचार करायचा आहे..”

ते म्हणाले, की “एखाद्या विशिष्ट समाजासंदर्भात भूमिका घेतल्यास त्याचा परिणाम अन्य समाजावर, धार्मिक उत्सवावर काय होईल, यावरही चर्चा झाली. खेड्यांमध्ये रोज भजनं, कीर्तनं, कार्यक्रम सुरू असतात. नवरात्रोत्सव, गणेशोत्सव, गावांच्या यात्रांवर काय परिणाम होतील, यावरही चर्चा झाली. कायदा सगळ्यांसाठी समान असल्याने वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळी भूमिका घेता येणार नाही. सर्वांसाठी एकच भूमिका घ्यावी लागेल..”
“ध्वनी प्रदुषणाबाबत सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्याने तो संपूर्ण देशाला लागू आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारनंच राष्ट्रीय स्तरावर निर्णय घेतल्यास तो संपूर्ण देशासाठी लागू असेल.. राज्यांना वेगळा निर्णय घ्यावा लागणार नाही. त्यासाठी सर्व पक्षांच्या शिष्टमंडळानं केंद्रीय नेत्यांना भेटून भूमिका स्पष्ट करावी, अशी आमची भूमिका आहे..” असे ते म्हणाले.
‘अजान’चा भोंगा बंद करता येणार नाही.

“सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत भोंगे वापरायला परवानगी आहे. त्यामुळे या काळात ‘अजान’चा भोंगा बंद करता येणार नाही. राज्य सरकार फक्त आवाजाची मर्यादा पाळायला सांगू शकतं.. मात्र, रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत भोंगे वापरता येणार नाहीत. यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांशी ‘गाईडलाइन्स’बाबत बोलू. मात्र, राज्यात कायदा- सुव्यवस्थेचा भंग झाल्यास कारवाई केली जाईल..” असा इशारा वळसे पाटील यांनी दिला.

दरम्यान, राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे, तसेच भाजपचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. त्याबद्दल वळसे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. या वेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -