चंद्रपूरमध्ये भीषण अपघाताची (Chandrapur Accident) घटना समोर आली आहे. चंद्रूपर- मूल मार्गावर अजयपूर येथे भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि टँकरच्या भीषण अपघातामध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री उशिरा हा अपघात झाला आहे. अपघातानंतर ट्रकला भीषण आग लागली. या आगीमध्येच होरपळून अनेक जणांचा मृत्यू झाला. या अपघाताचा तपास चंद्रपूर पोलिसांकडून (Chandrapur Police) सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर आणि लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. चंद्रपूर-मूल मार्गावरच्या अजयपूर येथे ही घटना घडली. अपघातानंतर ट्रकचे टायर फुटले आणि आग लागली. ट्रकमध्ये लाकूड असल्यामुळे ट्रकला भीषण आग लागली. या आगीमध्ये ट्रकमध्ये बसलेल्या सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर मृतांमध्ये टँकरच चालक आणि वाहकांचा देखील समावेश आहे. या अपघातामध्ये एकूण 9 जणांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच चंद्रपूर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. या आगीमध्ये होरपळून तोपर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला. चंद्रपूर पोलिसांनी तसेच हे मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यातून चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. अपघातातील मृतांचे मृतदेह जळाल्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले होते. अपघातानंतर या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
या अपघातामध्ये पेट्रोलच्या टँकरमधील चालक अमरावती निवासी हाफीज खान आणि वाहक वर्धा निवासी संजय पाटील यांचा मृत्यू झाला आहे. तर लाकडाच्या ट्रकमधील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. ट्रकमधील 7 जण बल्लारपुर तालुक्यातील नवी दहेली आणि कोठारी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नवी दहेली आणि कोठारी गावावर शोककला पसरली आहे. हा अपघात कसा झाला याचा तपास चंद्रपूर पोलिसांकडून सुरु आहे.






