ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर; राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान एका घटना समोर आली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनांच्या ताफ्याला रस्ता मोकळा करून देतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात एक पोलिस कर्मचारी जीप चालकाला चापट मारताना दिसत आहे. आव्हाड हे अंबाबाई दर्शनासाठी जात असताना भाऊसिंगजी रोडवर ही घटना घडली आहे. मागे आव्हाडांच्या गाड्यांचा ताफा असताना त्याला वाट मोकळी करुन देताना एका पोलिसाने जीप चालकाला चापट मारली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
आव्हाड यांच्या वाहनांचा ताफा आल्याने वाहतूक व्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांची तारांबळ उडाली. ताफ्याला रस्ता मोकळा करून देताना पोलिसांची अक्षरशः दमछाक झाली. ताफा अंबाबाई मंदिराकडे जात असताना भाऊसिंगजी रोडवर वाहतूक कोंडी झाली. यावेळी एका संतप्त पोलिसाने रस्ता मोकळा करताना जीप चालकाच्या हातावर चापट मारली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.