गेल्या काही दिवसांत शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खास करुन विद्यार्थिनींच्या सुरक्षेवरुन पालक वर्ग मोठ्या चिंतेत सापडला आहे.. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार विविध उपाययोजना करीत आहे.. शालेय मुलींच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने नुकतीच एक मोठी घोषणा केली..
राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी गृहरक्षक दलाच्या जवानांची (होमगार्ड) नियुक्ती केली जाणार आहे.. याबाबत गृहखाते, शिक्षण संचनालय व महासमादेशक कार्यालयाने कार्यवाहीही सुरू केली आहे. त्यामुळे राज्यात किमान 7 हजार होमगार्डची भरती केली जाणार असल्याचे समजते.
राज्य सरकारने विभागीय शिक्षण उपसंचालकांना पत्र पाठवले आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शाळा सुरू होताना व शाळा सुटण्याच्या वेळी राज्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये ‘होमगार्ड’ची सेवा उपलब्ध करून देण्याची सूचना पत्रात केलीय..
दरम्यान, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा सुरू होताना व बंद होताना, किंवा दिवसभर शाळेत होमगार्ड नेमता येईल का, याबाबतची सूचना प्रधान सचिवांनी बैठकीत केली.
प्रधान सचिवांच्या सुचनेनुसार, राज्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये प्रत्यक्षात किती होमगार्डची गरज आहे, ते तपासून विस्तृत माहिती शिक्षण संचालनालयास पाठवण्यास सांगण्यात आले आहे..
होमगार्डच्या मागण्या..
होमगार्डला सध्या रोज 670 रुपये मानधन मिळते. वर्षातून 180 दिवस ड्युटी असते. त्यात नवरात्र, गणेशोत्सव, निवडणुका, अन्य कार्यक्रमांचा समावेश आहे. इतर वेळी गवंडी काम, रिक्षा चालवणे, भाजीविक्री अशी छोटी मोठी कामे होमगार्डला करावी लागतात. मानधन तोकडे असल्याने घरखर्च भागवणे अशक्य होते. त्यामुळे वर्षभर ड्युटी मिळावी, अशी मागणी होमगार्डतर्फे करण्यात आली आहे.