ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आज औरंगाबादमध्ये होणार आहे. त्याकडे आता राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या सभेसाठी शिवसेनेने जोरदार तयारीही केली आहे. या सभेत औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे भाष्य करणार का? कोणत्या मोठ्या घोषणा करणार? कोणाला उद्देशून टीका करणार? या सगळ्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
दरम्यान, या सभेच्या ठिकाणी व्यासपीठाच्या एका बाजूला छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवल्याची माहितीही हाती येत आहे. यामुळे औरंगाबादच्या नामांतराच्याच पार्श्वभूमीवर ही तयारी असल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ही सभा शहरातल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. काही दिवसांपूर्वी याच मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही सभा झाली होती. त्या सभेप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठीही पोलिसांनी १५ अटी-शर्ती घातल्या आहेत. या सभेदरम्यान त्यांचं पालन करावं लागणार आहे. तसंच या सभेसाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.