रेंदाळ येथील आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँकेच्या इचलकरंजी शाखेतील अपहारप्रकरणी अखेर व्यवस्थापक रयाजी गणपती पाटील, कॅशिअर किरण तानाजी पाटील यांनी 1 कोटी 60 लाख 30 हजार रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणातून उघड झाले. त्यानंतर या दोघांना बडतर्फ करण्यात आले आहे. गायब असणाऱ्या संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दिल्याची माहिती अध्यक्ष अरुण महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्या दोघांच्या स्थावर मालमत्तांसंदर्भात कोणीही व्यवहार करू नये, असे नोटिसीद्वारे कळविले आहे. मालमत्तांवर बोजा नोंद करून जप्तीची प्रक्रिया सुरू आहे. शाखेतील इतर कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. अपहारासंबंधित माहिती यापूर्वीच रिझर्व्ह बँकेला कळविण्यात आल्याचेही महाजन यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष रावसो कोळी, चंद्रकांत शिंगारे, सदाशिव पाटील, सी.ई.ओ. सूर्यकांत जाधव, अॅड. ए. डी. पाटील, सत्यजित पाटील आदी उपस्थित होते.
रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीने वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण केले आहे. सहकार कायद्याच्या नियमानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. ती परवानगी मिळताच गुन्हा दाखल करू, असे चार्टर्ड अकाऊंटंट डी. ए. चौगुले यांनी सांगितले.