ताजी बातमी ऑनलाईन टीम
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारत राज्याच्या राजकारणामध्ये मोठा राजकीय भूकंप केला. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत जवळपास 46 आमदार त्यांच्या गटामध्ये सहभागी झाले. त्यामुळे आता राज्यातील ठाकरे सरकार पडणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे. अशामध्ये आता शिवसेना आक्रमक झाली आहे. बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र ठरवावे यासाठी शिवसेनेकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. यासंदर्भात त्यांना नोटीस देखील पाठवल्या जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बंडखोरी करणाऱ्या शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र ठरवावे अशा आशयाची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. त्यावर आता 16 आमदारांना 48 तासांच्या आत त्यांचे मत माडण्यास सांगण्यात आले आहे. या आमदारांनी आपले मत मांडले नाही, तर त्यांना अपात्र ठरवले जाणार आहे. त्यामुळे बंडखोरांना आता शिवसेनेचे कवच सोडावे लागणार आहे. आजपासून या बंडखोर आमदारांना नोटिस पाठवल्या जातील आणि त्यांना सोमवारपर्यंत वेळ देण्यात येईल, यावर त्यांना उत्तर द्यायचे आहे असे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले आहे.






