गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भीजत पडला आहे.. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांना उद्योग-व्यवसाय सुरु करता यावेत, यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मदत केली जाते.. मोठा गाजावाजा करीत 3 वर्षापूर्वी ही योजना सुरू झाली.. मात्र, अलीकडे निधीअभावी या योजनेला खिळ बसली होती..
मराठा समाजातील तरुणांना उद्योग उभारता यावेत, यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून 10 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज (loan) देण्यात येते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला आर्थिक निधीची चणचण जाणवत होती. त्यामुळे मराठा तरुणांना मदत करण्यात अडचणी येत होत्या.
राज्यात सत्तांतर झाले नि शिंदे सरकार सत्तेवर आले.. या सरकारने नुकतीच मराठा समाजातील तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे.. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधी देण्याचे आदेश शिंदे सरकारने दिले आहे. तसा ‘जीआर’ (शासन निर्णय) जारी करण्यात आला आहे..
30 कोटींचा निधी मिळणार
राज्य सरकारच्या ‘जीआर’नुसार, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 30 कोटींचा निधी देण्याची घोषणा सरकारने केली आहे. हा निधी लवकर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यासंदर्भात मराठा समन्वयकांनी सरकारकडे मागणी केली होती. त्याची दखल घेत शिंदे सरकारने हा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने वित्त विभागाच्या माध्यमातून हे आदेश काढले आहेत. निधी वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला सरकारकडून निधी मिळत नसल्याच्या तक्रारी होत होत्या. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे मराठा तरूणांना दिलासा मिळाला आहे.