ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या पूर पातळीत संथ गतीने वाढ सुरूच आहे. पाणी पातळी संथ गतीने वाढत गुरुवारी रात्री 11 पर्यंत 41.8 फुटांवर पोहोचल्याने कोल्हापूरकरांवर महापुराचे सावट कायम आहे. पंचगंगा धोक्याच्या पातळीजवळ आल्याने नागरिकांची धाकधूक वाढली आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. राधानगरी धरणाचे एकूण पाच स्वयंचलित दरवाजे खुले असून त्यातून 8 हजार 740 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कोल्हापूर-पन्हाळा मार्ग वाहतुकीसाठी दुसऱ्या दिवशीही बंद राहिला. गुरुवारी कसबा बावडा – शिये, कदमवाडी – मार्केट यार्ड हे दोन रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली असून एकूण 54 मार्गावरील वाहतूक बंद आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गुरुवारी पावसाने उघडीप दिली. मात्र जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. राधानगरी आणि दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळी सात ते सायंकाळी चार या आठ तासांत अतिवृष्टी झाली. राधानगरी परिसरात 90 मि.मी. तर दूधगंगा परिसरात 70 मि.मी. पाऊस झाला. जोरदार पावसाने राधानगरीच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली.
राधानगरी धरणाचा 4 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा गुरुवारी पहाटे 4 वाजून 19 मिनिटांनी बंद झाला. यामुळे गुरुवारी दुपारपर्यंत पाच आणि सहा क्रमांकाचे दोनच दरवाजे खुले होते. गुरुवारी सायंकाळी 4 वाजून 11 मिनिटांनी तिसऱ्या क्रमांकाचा आणि 4 वाजून 15 मिनिटांनी 4 क्रमाकांचा दरवाजा खुला झाला. त्यानंतर पाच वाजता सातव्या क्रमांकाचा दरवाजा खुला झाला. धरणाचे पाच दरवाजे खुले झाल्याने त्यातून वीज निर्मितीसह एकूण 8 हजार 740 क्यूसेक विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे. यामुळे भोगावतीची पाणी पातळी वेगाने पुन्हा वाढ होऊ लागली आहे. परिणामी पंचगंगेच्या पाणी पातळीतही वाढ होण्याची शक्यता आहे.