ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या समर्थनार्थ ३७५ फूट लांब तिरंगा ध्वजाची पन्हाळ्यावर रॅली काढण्यात आली. कोल्हापूर हायकर्स, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर, व पन्हाळा नगरपरिषद, पन्हाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी ८ वाजता बाजीप्रभू देशपांडे पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापर्यंत रॅली काढण्यात आली.
विद्यार्थी व नागरिकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत दोनशेहून अधिक विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते. ही पदयात्रा नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यापासून ते राजदिंडी मार्गा पर्यंत झाली. या पदयात्रेनंतर सहभागी विद्यार्थी व नागरिक पन्हाळा ते पावनखिंड या साहस यात्रेला रवाना झाले. अभिनेत्री सोनाली पाटील यांच्या हस्ते ध्वज दाखवून साहस यात्रेला सुरुवात झाली.