ताजी बातमी ऑनलाईन टीम
रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथील समुद्रात संशयास्पद बोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बोटीत स्फोटकं सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणात हायअलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत. मात्र, टेरर अँगलने तपास केला जात असल्याचं वृत्त फडणवीसांनी फेटाळलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, की रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटमध्ये 3 एके-47 आढळून आल्या आहेत. तसेच लाईफजॅकेट व इतर साहित्य देखील आढळून आले आहे. ही बोट ऑस्टेलियातील असून लेडी हार्न असे तिचे नाव आहे.ती हाना लॉडर्न्स गन नामक ऑस्टेलियन व्यक्तीच्या मालकीची आहे. या घटनेनंतर किनारपट्टी भागात नाकाबंदी करण्यात आली आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.