टी-20 वर्ल्ड कप 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना उद्या म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. देशभरातील क्रिकेट प्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. असे असतानाच भारताचा स्टार क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 2007 मध्ये पहिल्यांदाच भारतीय टीम ही महेंद्र सिंह (M S Dhoni) धोनीच्या नेतृत्त्वाखाली टी-20 वर्ल्ड कपसाठी मैदानात उतरली होती. तेव्हापासून पहिल्यांदाच आता माही टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा भाग नसणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.
कॅप्टन कूल धोनीला चाहते करत आहेत मिस
महेंद्र सिंह धोनीला रियाटर होऊन आता दोन वर्षे झाली आहेत. मात्र त्याचे चाहते त्याला अजुनही खूप मिस करतात. आजही भारतीय टीम एखाद्या मॅचमध्ये पराभूत झाली तर धोनीची आठवण काढली जाते. सोशल मीडियावर त्याचे चाहते त्याचे मिम्स आणि पोस्ट नेहमीच शेअर करत असतात. सध्या त्याचा असाच एक व्हिडिओ व्हायल होतोय. ज्यामध्ये तो, ‘मी वर्ल्ड कप खेळणार नाही’ असे बोलताना दिसतोय. यावरच सॅड इमोजी पोस्ट करुन हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
काय म्हणाला धोनी ?
धोनी नुकताच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. तिथे अँकरने क्रिकेटवर बोलण्यास सुरुवात केली. तेव्हा धोनीने त्याला मध्येच थांबवले. तो असे काही म्हणाला की, चाहत्यांना आता ते पाहून दुःख होतेय. मुलाखतीमध्ये क्रिकेट आणि टी-20 वर्ल्ड कपचा उल्लेख होताच धोनी म्हणाला की, ‘मी वर्ल्ड कप खेळत नाहीये. टीम पहिलेच रवाना झाली आहे.’ हे बोलून तो हसू लागला. मात्र त्याचे हे वाक्य त्याच्या चाहत्यांना दुःखी करत आहे.
धोनीच्या नेतृत्तवाखाली भारताने जिंकला होता वर्ल्ड कप
ICC T20 वर्ल्ड कप 2007 मध्ये सुरु झाला जेव्हा भारतीय T20 संघाने प्रथमच एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरला होता. भारताने ते विजेतेपद पटकावले. तेव्हापासून धोनी पुढील प्रत्येक T20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय ड्रेसिंग रुमचा भाग होता. मात्र यावर्षीय तो पहिल्यांदाच भारतीय संघात असणार नाही. यामुळे त्याचे चाहते त्याला खूप मिस करत आहेत. दरम्यान धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अजूनही सक्रिय क्रिकेटपटू आहे. तो आयपीएल खेळतो. आगामी हंगामातही तो चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे.