बॉलिवूड अभिनेत्री सोमी अली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीने सलमान खानसोबतचा तिचा जुना फोटो शेअर करत पुन्हा एकदा अभिनेत्यावर निशाणा साधला आहे. सोमी अलीने सलमान खानवर मारहाणीचा आरोप केला आणि काही वेळाने तिची पोस्ट डिलीट देखील केली. इतकेच नाही तर सोमी अलीने सलमान खानला सपोर्ट करणाऱ्या अभिनेत्रींवरही हल्लाबोल केला आहे.
सोमी अलीने सलमान खानसोबतचा स्वतःचा एक जुना फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेता तिला गुलाब देताना दिसत आहे. यासोबत सोमीने लिहिले की, ‘अजून बरेच काही व्हायचे आहे. माझ्या शोवर भारतात बंदी घालण्यात आली आणि त्यानंतर वकिलांनी मला धमक्या दिल्या. तू भित्रा आहेस माझ्या रक्षणासाठी 50 वकील उभे राहतील, जे मला सिगारेटच्या चटक्यांपासून आणि वर्षानुवर्षे माझ्यावर होणाऱ्या शारीरिक अत्याचारापासून वाचवतील. हेच तु माझ्यासोबत अनेक वर्षे केले आहे.’
इतर अभिनेत्रींवरही साधला निशाणा
सोमी अलीने इतर अभिनेत्रींवर निशाणा साधत म्हटले की, महिलांवर अत्याचार करणाऱ्या पुरुषाचे समर्थन करणाऱ्या सर्व अभिनेत्रींना लाज वाटली पाहिजे. जे अभिनेते अशा लोकांना सपोर्ट करतात, त्यांना देखील लाज वाटली पाहिजे. आता ही ‘आर या पार’ची आहे.’ सोमी अलीची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागली. मात्र, काही वेळाने अभिनेत्रीने ती डिलीट केली.
यापूर्वीही केले होते सलमानवर आरोप
सोमी अलीने सलमान खानवर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. मैने प्यार कियाचे पोस्टर शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले होते की, त्यांची पूजा करणे बंद करा. यासोबतच तिने सलमान खानचे नाव न घेता त्याच्यावर मारहाणीचा आरोपही केला होता. सोमी अली आणि सलमान खान 90 च्या दशकात रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही अनेक जाहिरातींमध्ये एकत्र दिसले होते. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि ती अमेरिकेत शिफ्ट झाली.