सर्व्हर डाऊनमुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना येणाऱया अडचणींची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगाने अर्ज पारंपरिक पध्दतीने भरण्याची परवानगी दिली आहे. आज शुक्रवारी अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी सायंकाळी 5.30 पर्यंत वेळही वाढविण्यात आली आहे, याबाबतचे आदेश आयोगाचे उप सचिव के. सुर्यकृष्णमूर्ती यांनी जिल्हाधिकाऱयांना दिले आहेत.
यापूर्वी आयोगाने संगणकीय प्रणालीद्वारे उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले होते. परंतु इच्छुक उमेदवार निवडणुकीपासून वंचित राहू नयेत, यासाठी उमेदवारी अर्ज पारंपरिक (ऑफलाईन पध्दतीने स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आज, शुक्रवारी अखेरच्या दिवशी सायंकाळी 5.30 पर्यंत वेळही वाढविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱयांनी सर्व निवडणूक अधिकारी व संबंधित यंत्रणेला पारंपरिक पध्दतीने स्विकारण्याबाबत व वाढीव वेळेच्या सुचना द्याव्यात, उमेदवारी अर्ज व घोषणापत्र यांचे कोरे नमुने इच्छुक उमेदवारांना उपलब्ध होतील, याची व्यवस्था करावी.
सर्व संबंधित तहसिलदारांनी पारंपरिक पध्दतीने स्विकारलेले अर्ज छाननी प्रक्रीया पूर्ण झाल्यावर केवळ वैध उमेदवारी अर्ज संगणक चालकाच्या मदतीने संगणक प्रणालीमध्ये भरुन घ्यावेत, असे या आदेशात म्हंटले आहे.