हिवाळ्याचे दिवस सुरु असतानाच अचानकच महाराष्ट्रात हवामानानं रुपडं बदललं आणि अनेकांचे डोळे चमकले. कारण, थंडीच्या दिवसांमध्येच महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मंदोस’ (mandous Cyclone update) चक्रीवादळामुळे राज्यात उद्या (रविवारपासून)13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम तामिळनाडूत होणार असल्याचं सांगण्यात आलं असून या भागात रेड अलर्टही देण्यात आला आहे. दक्षिणेकडे मोठे परिणाम होत असतानाच या चक्रीवादळाचा राज्यावरही मोठा परिणाम जाणवणार आहे.
महाराष्ट्रात कुठे कुठे पावसाची शक्यता?
राज्यातील मराठवाड्यात बीड, उस्मानाबाद, लातूर, पश्चिम महाराष्ट्रात नाशिक तर पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पाऊस दमदार हजेरी लावणार आहे. याशिवाय काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असाही अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
काही भागांत थंडीची लाट
पुणे शहर आणि परिसरात रात्रीच्या किमान तापमानात एकाएकी घट झाल्यामुळं अचानकच थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. तापमानातील ही घट पुढील दोन दिवस कायम राहणार असून, त्यानंतर तापमान पुन्हा काही अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. एकिकडे पाऊस आणि एकिकडे थंडीत झालेली वाढ पाहता त्याचे परिणाम म्हणून काही भागांमध्ये सकाळच्या वेळी उन्हाचा कडाका वाढलेला असेल.