Monday, February 23, 2026
Homeमहाराष्ट्रखोके सरकार, खोटे सरकार… घोषणा! शिंदे सरकारविरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

खोके सरकार, खोटे सरकार… घोषणा! शिंदे सरकारविरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

तब्बल तीन वर्षांनी नागपूरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. महापुरूषांचा अपमान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, राज्याबाहेर गेलेले प्रकल्प, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी कंबर कसली आहे. कर्नाटक सरकार हाय हाय.. बोम्मई सरकार हाय हाय… शिंदे सरकार हाय हाय… गद्दाराचे पाप महाराष्ट्राला ताप… खोके सरकार, खोटे सरकार… 50 खोके एकदम ओके… खोके सरकार काय म्हणतंय, गुजरातला प्रकल्प न्या म्हणतंय… शेतकऱ्याला मदत नाय म्हणतंय… महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक…शिंदे सरकारचा निषेध करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत विधानभवन परिसर दणाणून सोडला.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिंधे सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. त्यामुळे विरोधकांना प्रत्युत्तर देण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसोटी लागणार आहे.

शिंदे-भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर विरोधक म्हणजेच महाविकास आघाडीतील नेते आक्रमक झाले आहेत.दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चा काढण्यात आला होता. नागपुरात अधिवेशन सुरू असताना अनेक मोर्चे, निदर्शने विधिमंडळाबाहेर करण्यात येणार आहेत. यंदा सुमारे मोर्चांची संख्या 61 हून अधिक आहे.

या मुद्द्यांवरून अधिवेशन गाजणार…
नवं लोकायुक्त विधेयकाच्या मागणीला देखील जोर आला आहे.रविवारी झालेल्या बैठकीत सरकारने याबाबत जाहीर केलं होतं. त्यामुळे लोकायुक्त विधेयक आजच समागृहात मांडलं जातं का, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज, सोमवारी संध्याकाळी 4 वाजता महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला अजित पवार, बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे उपस्थित राहाणार असल्याचे समजते.

तर जनसंघर्ष उभारणार- नक्षलवाद्यांचा इशारा…
नागपुरात विधिमंडळांचं अधिवेशन होत असताना नक्षलवाद्यांनी सरकारला इशारा दिला आहे. सुरजागड लोह खनिज खाणीचा विस्तार त्वरित रद्द करण्यात यावा, तसेच आदिवासींचा हित पाहणाऱ्या सर्व घटकांनी एकत्रित सरकार विरोधात जनसंघर्ष उभारावा, असं आवाहनही नक्षलवादी संघटना भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीच्या पश्चिम सब जोनल ब्युरोने एक पत्रक काढून केलं आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टीला बंदी घालण्यात आली आहे. तेंदूपत्तालाही जीएसटीतून सूट देण्याची मागणी देखील नक्षलवाद्यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे नागपूरात पोहोचणार…
तब्बल तीन वर्षांच्या खंडानंतर नागपुरात राज्य विधिमंडळाचं अधिवेशन होत आहे. विशेष म्हणजे या अधिवेशनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित राहाणार आहेत. उद्धव ठाकरे सायंकाळी नागपुरात पोहोचणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -