चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. चीनमधील रुग्णालयांमध्ये रुग्णांना ठेवण्यासाठी जागा नसल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चीनसोबतच जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेत देखील कोरोनाच्या व्हेरिएटमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले असून सुरक्षेच्या दृष्टीने उपाय केले जात आहे. भारतात कोविड-19 च्या नवीन प्रकारांचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकारने मंगळवारी सर्व राज्यांना जीनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच आज केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवियाआढावा बैठक घेऊन कोरोना संसर्गाबाबत चर्चा करणार आहेत. दरम्यान केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसंदर्भाती देखील नियमावली जारी केली आहे.
चीनमध्ये Omicrone BF.7 चा धुमाकूळ
चीनमध्ये Omicron चा sub-variant BF.7 ने धुमाकूळ घातला आहे. या व्हेरिएंटचा वेगाना प्रादुर्भाव होत आहे. तज्ज्ञांनुसार चीनची राजधानी बीजिंगमधील 70 टक्के लोक या प्रकाराच्या विळख्यात आले आहेत आणि हळूहळू मृतांची संख्याही वाढत आहे. चीनमधील परिस्थिती इतकी बिघली आहे की लोकांना अंत्यसंस्कारासाठी देखील रांगेत उभे राहावे लागत आहे. चीनमधील या परिस्थितीनंतर आता भारतासह इतर अनेक देश सतर्क झाले आहेत. चीननंतर कोरोना विषाणूचा पुन्हा एकदा संपूर्ण जगात प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे.
Omicrone BF.7 किती घातक?
कोरोना विषाणूचा Omicron प्रकार आणि त्याच्या अनेक उप-प्रकारांनी जगभरात कहर निर्माण केला होता. आता Omicron BF.7 (BF.7) च्या उप-प्रकाराचा चीनमधील लोकांना झपाट्याने संसर्ग होत आहे. Omicron च्या इतर प्रकारांपेक्षा BF.7 चा संसर्ग दर खूप जास्त असल्याचे सांगितले जात आहे. BF.7 ची लागण झाल्यानंतर काही लक्षणे दिसण्यासाठी म्हणजेच इनक्यूबेशन पीरियड कमी असतो.
ज्यांनी लस घेतली आहे त्यांना देखील हा प्रकार संक्रमित करू शकतो. एवढंच नाही तर जुन्या व्हेरियटच्या संसर्गानंतर शरीरात निर्माण झालेली प्रतिकारशक्ती देखील हा व्हेरिएंट सहज खंडित करू शकतो. तज्ञांनुसार BF.7 ची लागण झालेला रुग्ण 10 ते 18 लोकांना संक्रमित करू शकतो. परंतु अँटी टास्क फोर्सचे वरिष्ठ सदस्य आणि कोविड लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. एनके अरोरा यांनी सांगितले की चीनमधील परिस्थितीबद्दल भारताला काळजी करण्याची गरज नाही. कारण तशी परिस्थिती येथे निर्माण होणार नाही. मात्र सतर्क राहण्याची गरज आहे असे देखील ते म्हणाले. भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले आहे. त्यामुळे बहुतेक लोकांमध्ये संसर्गाशी लढण्याची प्रतिकारशक्ती आहे.
ही लक्षणे दिसताच व्हा सावध
Omicron चा sub-variant BF.7 व्हेरिएंटचा लोकांना झपाट्याने संसर्ग होऊ शकतो. परंतु तो फारसा धोकादायक नाही आणि त्याची लक्षणे Omicron च्या जुन्या प्रकारांसारखीच आहेत. या प्रकाराचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांमध्ये घशाचा गंभीर संसर्ग, अंगदुखी, सौम्य किंवा खूप ताप यासारखी लक्षणे दिसत आहेत.
असा करा बचाव
सध्या हिवाळा सुरू आहे आणि या हंगामात अनेक लोक सर्दी आणि फ्लूला बळी पडत आहेत. परंतु जर तुम्हाला तीन दिवसांपेक्षा जास्त ताप असेल आणि BF.7 ची लक्षणे दिसत असतील तर लगेच कोरोना चाचणी करावी. याशिवाय जे लोक आधीच कोणत्याही आजाराने त्रस्त आहेत त्यांनी त्यांची विशेष काळजी घ्यावी. तसेच लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांनीही काळजी घ्यावी.