ईडीची धाड पडल्यानंतर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ कोल्हापुरात दाखल झाले आहेत. कोल्हापुरात येताच पहाटे 5 वाजल्यापासून त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली आहे. कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी मीडियाशी पहिल्यांदाच सविस्तर संवाद साधला. या धाडसत्रामागे कोण आहेत हे आम्हाला माहीत आहे. यावर मी आताच बोलणार नाही. पण मी लवकरच यावर सविस्तर बोलणार आहे, असं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खुशाल कोल्हापुरात येऊन देवीचं दर्शन घ्यावं. त्याला आमची ना नाही, असंही मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.
दिवशी माझ्या घरावर धाड पडली त्या दिवशी मी मुंबईत होतो. कामानिमित्त गेलो होतो. मंगळवार, बुधवार हा माझा मुंबईला जाण्याचा परिपाठ असतो. मुंबईत गेल्यावर मला ईडीची धाड पडल्याची बातमी कळली. माझ्या घरावर पडलेली ही तिसरी रेड आहे. लोकांना हे आवडत नाही. त्यामुळेच माझ्यावर प्रेम करणारे लोक त्या दिवशी घराबाहेर जमले होते, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितंल.
त्यामुळेच लोक जमली
मी कोल्हापुरात आल्यावर सकाळी 5 वाजल्यापासून लोकांची रांग लागली आहे. लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. माझ्या घरावरील धाडसत्र संपेपर्यंत लोक माझ्या घराच्याबाहेर थांबले होते. 12 ते 4 तास ते माझ्या घराबाहेर उभे होते. ही माझ्या जीवाभावाची माणसं आहेत. मी आजपर्यंत जे काम केलं, त्यामुळेच लोक जमली. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो, असं ते म्हणाले.
काही कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्या दिवशी ही परिस्थिती चांगली हाताळली. थोडं काही वेगळं झालं असतं तर त्याने प्रतिमा मलिन झाली असती. मी प्रमुख कार्यकर्त्यांना सांगत होतो, लोकांना सांभाळा. सरकारी अधिकाऱ्यांना सहकार्य करा, अशी माहिती त्यांनी दिली.
ते ईडीच सांगेल
ईडीच्या हाती काय लागलं हे तेच सांगू शकतील. त्यावर बोलणं योग्य नाही. इतर ठिकाणीही छापे पडले. आधी दोन तास सोडले तर नंतर त्यांनी कुटुंबातील लोकांना त्रास दिला जात नाही, असंही त्यांनी सांगितलं.
घरावर धाड पडणार हे आधीच माहीत होतं
तसेच माझ्या घरावर धाड का पडली? त्यामागे कोण आहे? मी आज काही बोलणार नाही. त्यावर सविस्तर बोलेन. गेल्या पाच वर्षापासूनच हे सुरू आहे, असंही ते म्हणाले. दीपक नावाचा त्यांचा कार्यकर्ता सतत दिल्लीत जातो. त्यानेच चार दिवसापूर्वीच माझ्या घरावर धाड पडल्याचं सांगितलं होतं, असा दावाही त्यांनी केला.
मी खुली किताब
सोमय्यांना येऊ द्या. त्यांनी दर्शन घ्यावं. माझ्या कामाची माहिती घ्यावी. माझ्या सार्वजनिक जीवनाची माहिती घ्या. माझे कार्यकर्ते मंदिराकडे जाणार नाहीत. कार्यकर्त्यांनी जाऊ नये, असं आवाहन करतो, असं सांगतानाच मी सर्व खुलासे केले आहेत. त्यांनी जे आरोप केले आहेत.
त्यावर माहिती दिली आहे. त्यांना डिवचून काही अर्थ नाही. मी खुली किताब आहे. सर्वांना माहीत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच मी चुकीचं काही केलं नसेल तर मला खचून जाण्याचं कारण नाही, असंही ते म्हणाले.