Homeसांगलीहनुमानाच्या मूर्तीची विटंबना,मिरजेत तणाव ; महिला ताब्यात

हनुमानाच्या मूर्तीची विटंबना,मिरजेत तणाव ; महिला ताब्यात

मिरजेत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने लक्ष्मी मार्केट परिसरात असणाऱ्या जुन्या हनुमानाच्या मंदिरातील मूर्तीची विटंबना केली होती. सकाळच्या सुमारास सदरची बाब निदर्शनास येताच मिरजेतील हिंदुत्त्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हनुमानाच्या मूर्तीची विटंबना झाल्याचे कळताच संतप्त जमाव मिरज बंदचे आवाहन करताना. रस्त्यावर उतरत मिरज शहर पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढून घटनेचा निषेध नोंदविला. या घटनेची माहिती संपूर्ण मिरज शहरात पसरताच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सदरचे कृत्य एका मनोरुग्ण महिलेने केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

हिंदमाता चौकातील मजती सराफ दुकानाच्या पाठीमागील बाजूस आणि नामदेव मंदिरा शेजारी असलेल्या मारूती मंदिरात दररोज पुजारी १०.३० ते ११ वाजण्याच्या दरम्यान पूजा करून जातो. पुजारी पुजा करून गेल्यानंतर काही नागरीक नेहमी प्रमाणे मंदिरात दर्शनासाठी येत असतात. काही नागरीक तेथे दर्शनासाठी गेल्यानंतर त्यांना मुर्तीची विटंबना झाल्याचे दिसले. यामुळे हिंदुत्ववादी संघटना या आक्रमक झाल्या. पोलिसांना याची माहिती समजताच बंदोबस्तात वाढ केली.

तत्पूर्वी वातावरण बिकट होत चालल्याने मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरातील सर्व दुकाने व्यापाऱ्यांनी बंद केली होती. चौकामध्ये मोठ्या प्रमाणात लोक जमू लागले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मिरजेत मोठा फौजफाटा तैनात केला होता. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी मिरजेत धाव घेत शांतता राखण्याचे आवाहन केले.

दरम्यान, मूर्तीची विटंबना करणाऱ्या एका महिलेस पोलिसांनी तातडीने तपास करून ताब्यात घेतले. जया रमेश आवळे (वय ३७ रा.मिरज) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून तिने सदरचा गुन्हा कबूल केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली. मिरजेत सर्व धर्मियांनी शांतता पाळावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य कोणीही करू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मिरजेत भेट देऊन शांततेचे आवाहन केले आहे.

दंगलीची अफवा आणि तणाव सदर घटनेने हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या मिरजेमध्ये परत दंगल घडल्याची अफवा पसरली होती. सोशल मिडीयावर दंगलीच्या अफवांचे पीक जोमात सुरू झाले. त्यामुळे अनेकांचे भ्रमणध्वनी खणखणत होते. प्रत्येकांच्या भ्रमणध्वनीवर मिरजेत काय झालं ? अशी विचारणा होत होती. पोलिसांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आपला फौजफाटा सज्ज ठेवला होता. शहरातील दुकाने पटापट बंद झाली होती. या घटनेमुळे ऐन रमजान महिन्यात वातावरण कमालीचे तंग बनले होते. परंतु नंतर खरी वस्तुस्थिती समजल्यानंतर वातावरण निवळल्याने पोलिसही तणावातून काही अंशी मुक्त झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -