मिरजेतील कृष्णाघाट कृष्णानदी पात्रात सहा वर्षा मुलगा देवा सुभाष इंगोले (रा. गणेशवाडी, सोलापूर) यांचा बुडून मृत्यू झाला. मृत देवा इंगोले याचे वडिल जेथे यात्रा, जत्रा भरते तेथे पाळणे लावून व्यवसाय करतात. कायम ते भटकंतीवर असतात. आज बुधवार दुपारी आई- वडील कपडे धुण्यासाठी गेले होते. त्यांच्या सोबत त्यांची मुले होती. पुलाकडील आरसीसी घाटावर आई कपडे धुत होती. व शेजारील दगडी घाटावर लहान मुलगा व मुलगी पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने देवा हा अचानक पाण्यात बुडाला. हे त्याच्या बहिणीने पाहून तिच्या आईस जाऊन सांगितले. नदीवर पोहायला गर्दी असल्याने ही घटना लवकर कोणाच्याही लक्षात आली नव्हती.
याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुनिल मोरे यांनाही समजली त्यांनी अग्निशमन विभागास माहिती दिली घटनास्थळी अग्निशमनचे जवान दाखल झाले. अग्निशमन दलाच्या बोटीने व आयुष सेवाभावी संस्था, स्पेशल रेस्क्यू फोर्स, आपत्ती मित्र, गांधी चौक पोलिस स्टेशन कडील पोलिस अंमलदार यांनी मिळून नदीत शोधले असता पाण्यात घाटावर मृतदेह मिळून आला. सदर मृतदेह
आयुष सेवाभावी संस्था यांच्या रुग्णवाहिकेतून मिरज सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. मुलाचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी टाहो फोडला होता. यावेळी महापालिका उप अग्निशमन अधिकारी सुनिल माळी, फायरमन रोहित निकम, विक्रमसिंह कोरे, ड्रायव्हर लिंगापा कांबळे, अतिक्रमणचे भरत माळवदे यांच्या पथकाने शोधकार्यात सहभाग घेतला होता.





