कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस घेऊनदेखील 8 हजार 869 नागरिकांना कोरोनाने गाठले आहे. यामध्ये दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोना झालेल्यांची संख्या कमी आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 230 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर मात्र कोरोना झालेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही.
सुरुवातीला लसीबाबत लोकांच्या मनामध्ये भीती होती. त्यामुळे लोक लस घेण्यास घाबरत होते. परंतु, यासंदर्भात जनजागृती करण्यात आल्यानंतर आणि लसीचे महत्त्व समजू लागल्यानंतर लोकांचे पाय आपोआप लसीकरण केंद्रांकडे वळू लागले. ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले त्यांना कोरोना झाला तरी धोका नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर तर लोकांच्या लसीकरण केंद्रांपुढे रांगा लागू लागल्या.
लस घेतल्यानंतर प्रतिकारक शक्ती तयार होण्यासाठी साधारणपणे तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागतो, हे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही जिल्ह्यात आजअखेर 8 हजार 869 नागरिकांना कोरोना झाला. त्यापैकी पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना झालेल्या नागरिकांची संख्या 6 हजार 574 इतकी आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या 2 हजार 295 इतकी आहे.
पहिला डोस घेतल्यानंतर 15 दिवसांच्या आत कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या 5 हजार 490, तर 15 दिवसांनंतर कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 84 इतकी आहे. पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना झालेल्यांपैकी 230 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये डोस घेतल्यानंतर पहिल्याच आठवड्यात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 163 इतकी आहे. दुसर्या आठवड्यात 50, तर तिसर्या आठवड्यात मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 17 आहे.
दुसरा डोस घेतल्यानंतरही कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या 2 हजार 295 इतकी आहे. त्यामध्ये पहिल्या 15 दिवसांच्या आत 1 हजार 913, तर 15 दिवसांनंतर आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 382 इतकी आहे. दोन्ही डोस ज्यांचे पूर्ण झाले अशा एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
डोस घेतल्यानंतर कोरोना रुग्णांची सर्वाधिक 1,617 संख्या हातकणंगले तालुक्यात आढळली. लस घेतल्यानंतर सर्वाधिक 55 कोरोना रुग्णांचा मृत्यूदेखील याच तालुक्यात झाला आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर शिरोळ(shirol) तालुक्यात सर्वाधिक रुग्णांची संख्या 668 इतकी आढळून आली.