Sunday, August 3, 2025
Homeसांगलीदारूसाठी पैसे न दिल्याने मित्राच्या वडिलांचा दगडाने ठेचून निर्घृण खून

दारूसाठी पैसे न दिल्याने मित्राच्या वडिलांचा दगडाने ठेचून निर्घृण खून

सांगली : दारूसाठी पैसे न दिल्याने वृद्धाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आला.सुनील श्रीरंग तरटे (वय ६५, राजगुरुनगर झोपडपट्टी, शनिवार पेठ, माधवनगर) असे त्या वृद्धाचे नाव आहे. माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावरील कंजारभाट वस्तीवर शुक्रवारी (ता. ११) रात्री ही घटना घडली.

खुनाची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी (Sangli Rural Police) घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी आठ तासांत संशयितास ताब्यात घेतले. विशाल अनिल देसाई (२३, राजगुरुनगर झोपडपट्टी, शनिवार पेठ, माधवनगर) असे त्याचे नाव आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की संशयित विशाल देसाई आणि मृत सुनील तरटे माधवनगर येथील राजगुरुनगर झोपडपट्टी येथे राहतात. काल रात्री साडेनऊच्या सुमारास विशालने मृत सुनील यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. सुनील यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा चिडलेल्या विशालने डोक्यात दगड घालून त्यांचा निर्घृण खून केला.

माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावरील कंजारभाट वस्तीवरील रस्त्यावर ही घटना घडली. डोक्यात मोठ्या प्रमाणावर इजा झाल्याने अतिरक्तस्त्राव होऊन सुनील यांचा मृत्यू झाला. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच ‘सांगली शहर’चे उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, ‘ग्रामीण’चे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्यासह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मृत सुनील यांचा मुलगा गणेश तरटे (२४) याने फिर्याद दिली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सहायक निरीक्षक सुशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार संतोष माने, मेघराज रूपनर, सुशील मस्के, सचिन कोळी, हिम्मत शेख, रणजित घारगे, विठ्ठल माने, विष्णू काळे, संजय बनसोडे यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत संशयित विशाल देसाई याला आठ तासांत ताब्यात घेतले. दरम्यान, त्याला आज न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सहायक निरीक्षक सुशांत पाटील अधिक तपास करत आहेत.मित्राच्या वडिलांनाच मारले

फिर्यादी गणेश तरटे आणि संशयित विशाल देसाई हे दोघे मित्र होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने दोघेही हमाली करत होते. एकाच ठिकाणी कामाला जात होते. कामावरून घरी परतल्यानंतर विशाल हा दारू पिण्यासाठी जायचा. त्याला वारंवार सांगूनही ऐकत नव्हता. काल सायंकाळी तो निघाला होता. त्या वेळी गणेश याचे वडील त्या ठिकाणाहून निघाले होते. पैशास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणातून हा खून करण्यात आला. प्राथमिक तपासात ही माहिती समोर आली असली, तरी पोलिस कसून तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -