Thursday, February 6, 2025
Homeइचलकरंजीताराराणी पक्षाची कार्यकारीणी लवकरच जाहीर आमदार प्रकाश आवाडे

ताराराणी पक्षाची कार्यकारीणी लवकरच जाहीर आमदार प्रकाश आवाडे

लोकसभा निवडणूकांचा बिगुल नजीकच्या काळात वाजणार आहे. त्यादृष्टीने सर्वांनी जोमाने तयारीला लागावे. ताराराणी पक्षाची मुख्य कार्यकारीणी तसेच युवकांची कार्यकारीणी लवकरच जाहीर करण्यात येईल, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले. शिवाय शहर परिसरातील वाढती गुंडगिरी व टोळ्यांना रोखण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, आम्ही त्यांच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. यावेळी चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इस्त्रोच्या सर्वच शास्त्रज्ञांच्या अभिनंदनाचा ठरावही यावेळी करण्यात आला.
ताराराणी पक्ष कार्यालयात संपन्न प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार प्रकाश आवाडे बोलत होते. अध्यक्षस्थानी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे होते.

यावेळी आमदार आवाडे यांनी, शहरातील वाढती गुंडगिरी आणि टोळ्यांचे कारनामे याला वेळीच आळा बसून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे यासह सुळकूड पाणी योजनेवरुन सध्या सुरु असलेले राजकारण, आगामी लोकसभा निवडणूका आणि शहर परिसरातील विकासकामे व त्यात अडथळे आणून महत्वाच्या विषयावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न या सर्वांवर सविस्तर ऊहापोह केला.
आमदार आवाडे यांनी, आगामी लोकसभा निवडणूका लवकरच होतील. त्या दृष्टीने आपल्याला जोरात तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे ताराराणी पक्षाची मुख्य कार्यकारीणी आणि युवकांची कार्यकारीणी जाहीर करण्यात येणार आहे. प्रत्येक मत महत्वाचे असल्याने प्रत्येक वॉर्डात मतदार नोंदणीचे काम गतीने करुन नवीन नोंदणी करुन घ्यावी.

त्यासाठी घराघरात पोहचा असे सांगितले. सध्या शहरात गुंडगिरी, दहशत, खून मारामार्‍या, अपहरण, खंडणी असे प्रकार वाढत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी आपल्या भागात असे प्रकार आढळून आल्यास भागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्वरीत पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा अथवा मला माहिती द्यावी. माहिती देणार्‍याचे नांव गुपित ठेवून पुढे काय करायचे ते मी बघून घेतो. शिवाय शहरात टोळ्या निर्माण होत चालल्या असून नागरिकांचे प्रश्‍न मार्गी लावण्याऐवजी काही पोलिस अधिकारी अशा टोळ्यांशी लागेबांधे करुन त्यांना पाठबळ देत आहेत. अर्थपूर्ण घडामोडीतून त्यांची कामे करत आहेत. सर्वांनी खंबीरणपणे अशा प्रश्‍नांना तोंड देऊन शहर गुंडगिरीमुक्त करुया असेही ते म्हणाले.
राज्य सरकारन गतीने विकासकामे करत आहेत. विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे.

त्यातूनच कोरोची आणि कबनूर येथे लवकरत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु होत आहे. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे रुपडे पालटत आहे. या रुग्णलयाचे आधुनिकीकरण, सिटी स्कॅन मशिनचा शुभारंभ आणि शहरातील एमएच 51 आरटीओ कार्यालयाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याचा मनोदय असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले. दलित समाजातील होतकरु व हुशार विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधांनीयुक्त अभ्यासिका सुरु करण्यासाठी 5 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्याचप्रमाणे चांगले शिक्षण यावर लक्ष केंद्रीय करुन आवश्यक त्याठिकाणी वाचनालये व अभ्यासिका सुरु करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. परंतु काही राजकीय पुढारी शहरातील विकासकामे थोपविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे टोलाही आमदार आवाडे यांनी लगावला.

लोकसभेसाठी उमेदवार कोण असेल याचा निर्णय पक्ष करेल त्यामुळे त्यामध्ये अधिक न गुंतता सर्वांनी जोमाने कामाला लागावे. शहरात आपल्या माध्यमातून जितकी कामे झाली आहेत तितकी कोणीच केलेली नाहीत. म्हणून पुढील काळातही एक उदाहरण निर्माण होईल अशा दृष्टीने कामे करुन संघटना अधिकाधिक मजबूत करुया, असे आवाहन आमदार आवाडे यांनी केले.
यावेळी प्रकाश मोरे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, स्वप्निल आवाडे, रुबन आवळे, चंद्रकांत पाटील, सर्जेराव पाटील, एम. के. कांबळे, सौ. उर्मिला गायकवाड, आण्णासाहेब गोटखिंडे, सुरज बेडगे, शितल पाटील, चंद्रकांत इंगवले, श्रेणिक मगदूम, सागर मुसळे, अनिल कुडचे, राजेंद्र बचाटे, श्रीरंग खवरे, राजू बोंद्रे, नजमा शेख, सौ. जेवरबानु दुंडगे, रजनी शिंदे, सपना भिसे आदींसह शहर व ग्रामीण भागातील आवाडे समर्थक, ताराराणी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -