Thursday, February 6, 2025
Homeइचलकरंजीकेस जिंकली असताना आपिल करण्याची गरजच काय -आमदार प्रकाश आवाडे

केस जिंकली असताना आपिल करण्याची गरजच काय -आमदार प्रकाश आवाडे

इचलकरंजीला सुळकूड योजनेचे पाणी मिळणारच आहे याबद्दल कोणाचेही दुमत नाही. परंतु प्रश्‍न सोडविण्यापेक्षा त्यामध्ये प्रश्‍न कसे निर्माण होतील असा प्रयत्न काही राजकीय मंडळींकडून सुरु आहे. अबाधित असलेली कायदा व सुव्यवस्था यामध्ये ठिगणी पडून अडचणी कशा तयार होतील असे मनसुबे काही मंडळींचे आहेत. परंतु आपण केस जिंकली असताना पुन्हा अपिल करण्याची गरजच काय आहे, असा सवाल आमदार प्रकाश आवाडे यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.

ताराराणी पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार प्रकाश आवाडे यांनी सुळकुड उद्भव दुधगंगा पाणी योजना संदर्भात सध्याच्या घडामोडीवर कोणावरही आक्षेप अथवा टीका न करता भाष्य केले. ते म्हणाले, कागलमध्ये आगामी निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय इर्ष्या सुरु आहे. परंतु ज्या त्या वेळी तेथील जनता काय निर्णय करायचा ते करते. असे असताना तेच वारे आता इचलकरंजीत वाहू लागले आहे. कोल्हापूरातील एका कार्यक्रमात मला मंत्री हसन मुश्रीफ, राजे समरजितसिंग घाटगे आणि खासदार संजय मंडलिक तिघेही भेटले होते. त्यावेळी मी त्यांच्याकडे या योजना संदर्भात विचारणा केली असता. तिघांनीही हसून काही नाही, जे होईल ते चांगलेच होईल असे सूचक विधान केले. मुळात शासनाने योजनेला स्थगितीच दिली नाही. आणि योजना शासनाने मंजूर केली असल्याचे पूर्णत्वाची जबाबदारी शासनाची आहे.

परंतु गावातील काही नेतेमंडळी भागाभागात बैठका, कॉर्नर सभा घेऊन आम्ही त्या योजनेसाठी प्रयत्न करत असल्याचे भासवत असून जनतेची दिशाभूल करत आहेत.
ज्या लोकांनी कृष्णा योजनेला विरोध केला ते शहरात बैठका सभा घेत सुटले आहेत. सत्य काय आहे ते जनतेसमोर यायला हवे. इचलकरंजीतील पाणी योजना संदर्भात आजपर्यंत काय काय झाले त्याची माहिती जनतेला झाली पाहिजे त्यासाठी ताराराणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भागाभागात बैठका लावाव्यात. त्यासोबत जाहीर सभेचे आयोजन करावे. त्या माध्यमातून संपूर्ण जनतेला इचलकरंजी शहरात नेमके काय चालले आहे याच्या माहितीसह सर्वच योजनांचा इतिहास व त्या पाठीमागचा संघर्ष समजेल.
इचलकरंजी महानगरपालिका पाच वर्षापासून कृष्णा पाणी योजनेची जलवाहिनी बदलण्याचे काम करत आहे आणि अद्याप ते पूर्ण झालेले नाही.

600 मीटरच्या जलवाहिन्या नुकत्याच कोठूनतरी आणण्यात आल्या. शिवाय पावणेतीनशे मीटर लांबीचा प्रश्‍न अद्याप गुलदस्त्यात आहे. जलवाहिन्या होत्या तर त्या बदलण्याऐवजी गळती काढून त्यामध्ये अर्थ शोधला जात असल्याचा सणसणीत आरोपही आमदार आवाडे यांनी पुन्हा एकदा केला. तत्कालीन नगरपरिषद आणि आत्ताची इचलकरंजी महानगरपालिका यातील काम न करता खोटी बिले आदा करुन महापालिकेची फसवणूक प्रकरणी आपण विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधीवरुन या प्रकरणात गुंतलेल्या सर्वच संबंधितांची लवकरच आर्थिक गुन्हे अन्वेषणकडून चौकशी होणार आहे. पाणी प्रश्‍नासह विविध विकासकामांसाठी महापालिका प्रशासनाकडूनही हवे तसे सहकार्य मिळत नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -