रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत राज्य परिवहन मंडळाच्या इचलकरंजी आगराच्या वतीने करण्यात आलेल्या सुयोग्य नियोजनाने दोन दिवसात तब्बल ८२ हजार २६० प्रवाशांनी एस.टी. ने प्रवास केला. त्यामध्ये ४६ हजार ३०६ महिला प्रवाशांचा समावेश होता. तर आगाराला दोन दिवसात २४ लाख ५६ हजार १९३ इतके उत्पन्न मिळाले, असल्याची माहिती आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी दिली.
रक्षाबंधन, नारळी पौर्णिमेनिमित्त इचलकरंजी आगाराकडून ३० व ३१ ऑगस्ट रोजी इचलकरंजी, सांगली, मिरज, कोल्हापूर, वाठार, नृसिंहवाडी, निपाणी या मार्गावर सकाळी ८ वाजलेपासून रात्री ८ वाजेपर्यंत स्वतंत्र जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ३० रोजी ८२ बसेसच्या माध्यमातून ३१ हजार २९६ किलोमीटरचा प्रवास झाला. त्यामध्ये २२ हजार ५०८ महिलांसह ४० हजार ११६ प्रवाशांनी प्रवास केला. यादिवशी १२ लाख १ हजार ३४४ इतके उत्पन्न प्राप्त झाले. तर ३१ रोजी ८२ बसेसच्या माध्यमातून ४२ हजार १४४ प्रवाशांनी ३१ हजार ५९१ इतक्या किलोमीटरचा प्रवास केला.
त्यामध्ये २३ हजार ७९८ महिला प्रवाशी होत्या. तर आगाराला १२ लाख ५४ हजार ८४९ इतके उत्पन्न मिळाले. इचलकरंजी आगाराने केलेल्या या नियोजनामुळे प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. तर आगामी काळातील सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी आगाराकडून प्रवाशांसाठी योग्य ते नियोजन केले जाईल, असेही व्यवस्थापक सागर पाटील यांनी सांगितले.