(Sangli) मराठा क्रांती मोर्चाला (Maratha Kranti Morcha) सुरुवात झाली आहे. शहरातील विश्रामबाग चौक मधील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली आहे. हा मोर्चा राम मंदिरापर्यंत निघणार आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला आहे. मराठा आरक्षण तसेच जालन्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक भागातून या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झाले आहे.
आमच्या मुलांच्या भविष्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमच्या मुलांनी चांगले गुण असूनही संधी मिळत नाही. त्यामुळं आम्हाला आमचे हक्क मिळावेत अशा भावना मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केल्या. मराठा क्रांती मोर्चासाठी गेल्या 10 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करण्यात आली होती. काल एक दिवस अगोदर मोर्चासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली होती. जिल्ह्यातील प्रत्येक भागातून या मोर्चामध्ये मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या मोर्चात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे सहभागी होणार आहेत.