ताजी बातमी ऑनलाईन टीम
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत २४ ऑक्टोबरला संपली. त्यानंतर पुन्हा त्यांनी उपोषणाचा लढा आणखी तीव्र केला आहे.त्यांच्या उपोषणाला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी, मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी तासगाव तालुक्यातील लिंब, बोरगाव, निंबळक, शिरगाव, पानमळेवडी आळते, चिखळगोठन या गावातील मराठा समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन तासगाव- विटा मार्गावर बोरगाव फाटा एस.टी स्टॅण्ड शेजारी आज शनिवारपासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे.
या आंदोलनात पंचक्रोशीतील सकल मराठा समाजातील बांधवांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला आहे. परराज्यात गलाई व्यवसायानिमित्त असलेले, तामिळनाडू राज्यातील सेलम येथून सुरेश शेठ चव्हाण, कर्नाटकमधून शंकर पाटील शेठ, बेंगलोर मधून राजेश पाटील शेठ हे खास मराठा समाजाच्या बेमुदत धरणे आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झाले आहेत.
दोनच दिवसांपूर्वी तासगाव तालुक्यातील बोरगावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय मंत्री, खासदार, आमदार व राजकीय पुढाऱ्यांना गावकऱ्यांनी प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला असून सकल मराठा समाजाच्यावतीने चुलीत गेले नेते , चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष. मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याच राजकीय नेत्याला गावात प्रवेश नाही असे फलक ठिकठिकाणी लावण्यात लावले आहेत. एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणुन समाजातून मोठ्या प्रमाणात उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.