सांगली ; गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताच्या मुसक्या आवळल्य
बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगून फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. सराईताकडून १ लाख ३३ हजार ४०० रुपयांची पाच पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. राजकुमार पाडुंरंग पाटोळे (वय २७, रा. हनुमाननगर नांगोळे, ता. कवठेमहांकाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने नागज फाटा येथे सदरची कारवाई केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी सागर लवटे यांना पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार राजकुमार पाटोळे हा नागज फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला होता. काही वेळाने तेथे पाठीला सॅक अडकवलेला एक युवक थांबलेला दिसला. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडील बँगची तपासणी केली असता त्याच्याकडे कापडात गुंडाळलेले एक देशी बनावटीचे पिस्तुल, चार देशी बनावटीचे मेपटे आणि सहा जिवंत काडतुसे आढळून आली. आरोपी राजकुमार पाटोळे याच्याकडे याबाबतचा परवाना नव्हता. सदर पाच पिस्तुल त्याने मन्नावर (जि. धार, राज्य मध्यप्रदेश) येथून आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी राजकुमार पाटोळे यास अटक करुन त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्तीनी त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.