राज्यात पडलेली कडाक्याची थंडी आता काहीशी ओसरत असून, हळुहळू बहुतांश भागांमध्ये उष्णतेचा दाह जाणवू लागला आहे. या साऱ्यामध्ये पावसाचं डोकावणंही सुरुच असल्यामुळं शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढू लागली आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवस विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर येथे पावसाची हजेरी असणार आहे. इथं विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. उत्तर महाराष्ट्र मात्र यास अपवाद ठरेल. कारण, राज्याच्या या एकमेव भागामध्ये सध्या थंडीचा कडाका कायम राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा, पुणे आणि कोल्हापूर भागामध्येही पहाटेच्या वेळी तापमान कमी राहणार असलं तरीही दुपारच्या वेळी मात्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. इथं मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात आर्द्रता जास्त राहणार असून, हवामान दमट असेल.
विदर्भाला गारपीठीनं झोडपलं…
गेल्या काही तासांमध्ये विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा तडाखा बसला आहे. नागपूर, वर्धा तसंच यवतमाळमध्ये अवकाळी पावसासह पुन्हा तुफान गारपीट झाली. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव, नांदगाव, वेळा, हिंगणघाट शहराला गारपिटीचा तडाखा बसला. बोरांच्या आकारापेक्षा मोठी गारपीट हिंगणघाटतालुक्यात झाली, त्यामुळे ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडितही झाला होता.
यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात अवकाळी पावसासह तुफान गारपीट झाली. नागपूर ग्रामीणमध्ये खातमारी परिसरात तसेच मौदा तालुक्यालाही गारपिटीचा तडाख बसलाय. अवकाळी गारपिटीच्या तडाख्याने गहू, हरभरा, तूर पिकांचं मोठं नुकसान झालं आणि शेतकऱ्याची चिंता आणखी वाढली. कमी दाबाचा पट्टा सक्रिय
सध्या देशाच्या उत्तरेकडेसुद्धा तापमानात चढ- उतार होत असून, कर्नाटकापासून विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं राज्यावर पावसाचं सावट पाहायला मिळत आहे.