सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यामुळे सरकारी नोकरीची हाव जवळपास प्रत्येकालाच असते. यामुळे सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांची संख्या आपल्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.
सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीची हमी दिली जाते. सहजासहजी त्यांना नोकरीवरून निष्काशीत केले जात नाही. शिवाय त्यांच्या पगाराची हमी असते. पगारा व्यतिरिक्त त्यांना इतरही अन्य भत्ते मंजूर केले जातात.
महागाई भत्ता, घर भाडे भत्ता, प्रवास भत्ता असे अनेक प्रकारचे लाभ त्यांना दिले जातात. विशेष म्हणजे वाढत्या महागाई सोबत टॅकल करण्यासाठी दर दहा वर्षांनी त्यांना नवीन वेतन आयोग लागू केला जातो. यामुळे त्यांचा पगार मोठ्या प्रमाणात वाढत असतो.
मात्र असे असले तरी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाने काही नियम तयार केलेले आहेत. या नियमांचे पालन करणे सरकारी कर्मचाऱ्यांना अनिवार्य असते.
दरम्यान आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांनी सलग किती दिवसांच्या सुट्ट्या घेतल्या तर त्यांची नोकरी जाते याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सलग पाच वर्षांची रजा घेतल्यास सक्तीची सेवानिवृत्ती मिळणार केंद्र सरकारने स्पष्टपणे म्हटले आहे की, जर एखादा कर्मचारी पाच वर्षांहून अधिक काळ रजेवर राहिला तर त्याची सेवा रद्द मानली जाईल. म्हणजेच अशा कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवा निवृत्ती दिली जाईल.
परराष्ट्र सेवेव्यतिरिक्त इतर कोणत्याही क्षेत्रातील सरकारी कर्मचारी पाच वर्षांहून अधिक काळ रजेवर राहिल्यास, त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे मानले जाईल. म्हणजेच कर्मचाऱ्यांना सलग ५ वर्षांपेक्षा जास्त रजा घेता येणार नाही, हे या नियमावरून स्पष्ट होत आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना शिक्षणासाठी सुट्टी
शिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना स्टडी लिव देखील दिली जाते. म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना अभ्यासासाठी, शिक्षणासाठी सुट्ट्या दिल्या जातात. सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या संपूर्ण सेवा काळात शिक्षणासाठी 24 महिन्यांची सुट्टी दिली जाते.
या सुट्ट्यांची विशेष गोष्ट अशी की या सुट्ट्या सलग घेतल्या जाऊ शकतात. किंवा मग टप्प्याटप्प्याने सरकारी कर्मचारी या सुट्ट्यांचा वापर करू शकतो आणि आपलाअभ्यास पूर्ण करू शकतो.
जे सरकारी कर्मचारी सेंट्रल हेल्थ सर्विस अंतर्गत येतात त्यांना शिक्षणासाठी 36 महिन्यांची सुट्टी दिली जाते. पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशनसाठी सुद्धा 36 महिन्यांची सुट्टी मंजूर केली जाते.