राज्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. महाराष्ट्रात एकूण 11 जागांसाठी मतदान होत आहे. त्यानंतर शेवटच्या टप्प्यासाठी येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात पंकजा मुंडे, रक्षा खडसे, अमोल कोल्हे, सुजय विखे पाटील, रावसाहेब दानवे, इम्तियाज जलील आदी नेत्यांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.
राज्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. राज्यात चौथ्या टप्प्यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजी नगर, मावळ, पुणे, शिरूर, नगर, शिर्डी आणि बीडमध्ये मतदान टाकलं जात आहे. सकाळपासूनच नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्कही बजवायला सुरुवात केली आहे. या दरम्यान राजकीय नेत्यांकडून अनेक दावेप्रतिदावेही केले जात आहेत. ही चर्चा सुरू असतानाच अजितदादा गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी मात्र मोठं विधान करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. शरद पवार यांना या निवडणुकीत सहानुभूतीची लाट मिळेल, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. ऐन मतदानाच्या दिवशीच दिलीप वळसे पाटील यांनी हे मोठं विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
दिलीप वळसे पाटील हे आजारी आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. आजारी असल्याने मला व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागला आहे. यावेळी तब्येतीच्या कारणाने सक्रिय प्रचारात सहभागी होता आलं नाही याची खंत आहे, असं सांगतानाच लोकसभा निवडणूक देशाच्या मुद्द्यांवर लढली जाते. पण यंदा पहिल्यांदाच याने काय म्हटले आणि त्याने काय म्हटले यावर ही निवडणूक लढवली जात आहे. शरद पवार यांना या निवडणुकीत सहानुभूतीची लाट मिळेल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
भारतासारख्या देशात राज्यघटनेने आपल्याला अधिकार दिला आहे. मतदानाचा अधिकार दिला आहे. नागरिकांनी सजग राहून हा अधिकार बजावला पाहिजे. आपल्या आवडीचं आणि देशाचं हित करणारं सरकार आलं पाहिजे. मी आवाहन करतो की, सर्व नागरिकांनी, तरुणांनी भरभरून मतदान करावं, असं आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केलं.
मतदार घराबाहेर पडेल
आता मतदानाचा टक्का कमी दिसत आहे. लोक घराबाहेर पडलेली नाहीत, त्याबद्दलही त्यांना विचारण्यात आलं. त्यावर हे चित्र दिवसभर असं राहणार नाही. लोक संध्याकाळपर्यंत हळूहळू बाहेर पडतील. मतदान करतील, असंही ते म्हणाले.
पहिल्यांदाच असं घडलं
आजारपणामुळे दिलीप वळसे पाटील यांना निवडणूक प्रचारापासून दूर राहावं लागलं. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. सध्या मी प्रवाहापासून बाहेर आहे. पहिल्यांदाच असं घडलं आहे. आजारी असल्यामुळे मला प्रचारात सहभागी होता आलं नाही, असं ते म्हणाले.
वळसे पाटलांना काय झालं?
दिलीप वळसे पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. घरात अंधारात लाईट सुरू करायला जात असताना ते पाय घसरून पडले. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर त्यांना औंध येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर काही दिवस उपचार करण्यात आले. पण त्यांची प्रकृती अधिकच खालावली. सध्या दिलीप वळसे पाटील घरी आहेत. पण त्यांच्या प्रकृतीला म्हणावा तसा आराम मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होता आलं नाही.