गेले दोन आठवडे संततधार पावसाने झेंडू, गुलाब, निशिगंध यासह इतर फुलांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. श्रावणात फुलांना मागणी वाढणार आहे. उत्पादन घटल्याने मिरजेतील फुलांच्या बाजारात आवक घटली आहे.
मात्र, अद्याप मागणी नसल्याने फुलांचे दर स्थिर आहेत.
श्रावण व गणेशोत्सवात फुलांना चांगली मागणी असल्याने सांगली जिल्ह्याच्या मिरजेत दररोज सकाळी भरणाऱ्या फुलांच्या एकमेव बाजारात खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल होते. निशिगंध, झेंडू, गलांडा, लीली, गुलाब या पारंपरिक फुलांसह डच गुलाब, जर्बेरा, कार्नेशिया आदी हरितगृहातील विदेशी फुलांची आवक मिरजेतील फुलांच्या बाजारात होते. श्रावणी सोमवार, नागपंचमी यासह विविध धार्मिक कार्यासाठी विविध फुलांना मागणी असते.
मिरजेतून कर्नाटक व गोवा, कोकणासह इतर शहरांत फुलांची निर्यात होते. हरितगृहात उत्पादन होणाऱ्या फ्रेंच गुलाब, जर्बेरा व कार्नेशिया या फुलांची मोठ्या शहरात निर्यात होते. मात्र, या वर्षी संततधार पावसाने रोग पडल्याने फुलांचे मोठे नुकसान झाले आहे.
श्रावणात निशिगंधासह पांढऱ्या फुलांना मागणी असते. मात्र, पावसाने निशिगंधाचे नुकसान झाल्याने आवक घटली आहे. यामुळे श्रावणाची प्रतीक्षा करणाऱ्या फुल उत्पादक शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. पावसाने फुले खराब होऊन उत्पादन घटल्याने या वर्षी श्रावणात फुलांची दरवाढ होण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टीचा परिणाम
जुलै महिन्यामध्ये सर्वत्र जोरदार पाऊस झाला. या पावसाचा प्रतिकूल परिणाम फूलांच्या वाढीवर झाल्याने विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनामध्ये मोठी घट झाली, परिणामी बाजारात फुलांची आवक घटली.
फुलांचे दर
• डच गुलाब – पेंडी २५०
• जर्बेरा – पेंडी ५० रुपये
• निशिगंध – ७० रुपये किलो
• झेंडू – ५० रुपये किलो
• गलांडा – ६० रुपये किलो
• गुलाब – २०० रुपये शेकडा