जिल्ह्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नंदुरबारमध्ये (Nandurbar Crime News) गेल्या तीन दिवसात तीन गुन्हे समोर आले आहेत. आता शहादा तालुक्यातील (Shahada Taluka) प्रकाशा (Prakasha) येथे वडिलांनी आपल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिला गर्भवती केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नराधम बापाला मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील 40 वर्षीय पित्याने एप्रिल 2024 ते जुलै दरम्यान स्वतःच्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी राहत्या घरी ती एकटी असताना शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केले. तसेच सदर घटना कोणाला सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली.
डॉक्टरांनी तपासताच नराधम बापाचे ‘पाप’ समोर
त्यामुळे त्या मुलीने वडिलांचा अत्याचार सहन केला. मात्र, पोट दुखत असल्याने तिच्या आईने दवाखान्यात (Hospital) नेले असता ही बाब उघडकीस आली. त्याबाबत विचारले असता मुलीने वडिलांनीच अत्याचार केल्याचे सांगितले. हे ऐकून आई हादरली. त्यानंतर आईने आपल्या मुलीसह शहादा पोलीस स्टेशन (Shahada Police Station) गाठत गुन्हा दाखल केला. आईच्या फिर्यादीवरून संशयिता विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
सफाई कर्मचाऱ्याने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी नंदुरबारमधील एका नामांकित शाळेमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली. कंत्राटी सफाई कामगाराने पाचवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला आपल्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवण्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.
या घटनेविषयी विद्यार्थिनीने आपल्या पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी नंदुरबार शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्या तक्रारीवरून शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून सदर कर्मचाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. शाळा प्रशासनाने कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्याला बडतर्फ केले आहे.