सध्या गणेशोत्सव सुरु आहे. यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज लालबागचा राजाच्या दरबारात पोहोचले. त्यांनी मनोभावे लालबागचा राजाचं दर्शन घेतलं
अजित पवार यांनी लालबागचा राजाच्या चरणी नतमस्तक होताना महाराष्ट्रासाठी प्रार्थना केली. सर्वांना समाधानी ठेव, असं अजित पवार यांनी यावेळी लालबागचा राजाला साकडं घातलं.
सध्या गणेशोत्सव सुरु आहे. त्यामुळे एक दिवस पुण्याला गेलो होतो. एक दिवस बारामतीला दर्शनासाठी गेलो होतो. आज मुंबईत लालबागचा राजा, चिंतामणी आणि सिद्धिविनायक दर्शन घ्यायला आलो, असं अजित पवार म्हणाले.
माझा नेहमी कटाक्ष असतो. गर्दीच्या वेळेला आपल्या दर्शनामुळे लोकांना त्रास नको. आज वर्किंग डे असल्यामुळे जास्त गर्दी नाहीये. बापाकडे काय मागितलं नाही. राज्यात सुख- समाधान- शांती लाभो आणि सर्वांची भरभराट होऊ दे… प्रत्येकाची भावना असते सर्वांचं भलं होऊ दे, असं अजित पवारांनी बाप्पा चरणी इच्छा व्यक्त केली.
राज्यात ओला दुष्काळ असला तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांची नजर आहे. जी काय मदत राज्याकडून केंद्राकडून करायचे असेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या परिस्थितीतून शेतकऱ्यांना उभा करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असंही अजित पवार यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.