राज्यातील महिला मतदारांना समोर ठेवून महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली. या योजनेचा मोठा गाजावाज होत असून आत्तापर्यत लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची मोठी झुंबड उडालेली गेल्या काही महिन्यांत दिसते. मात्र सरकारकडून दरमहा मिळणारे पैसे लाटण्यासाठी अनेक गैरप्रकार झाल्याचे, फसवणूक झाल्याचीही अनेक उदाहरणे गेल्या काही काळात उघड झाली आहेत. छत्रपती संभाजीनगरातील कन्नड तालुक्यात 12 भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचे अर्ज पुरुषांनी भरल्याचे समोर आले होते. असाच फसवणुकीचा एक प्रकार आता अकोल्यातही घडला असून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क 6 पुरुषांनीच अर्ज भरल्याचे प्रकार उघड झाला आहे. अकोल्यातील या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
काय आहे प्रकरण ?
ही बातमी आहे अकोल्यातून, तेथून एक आगळी-वेगळी पण तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क 6 तरूणांनी अर्ज केल्याचे उघड झाले. ते 6 जणही अकोला शहारातील रहिवासी असून त्यांनी नारीशक्ती दूत ॲपवर स्वतःचे आधार कार्ड अपलोड करून, संपूर्ण खोटी माहिती भरल्याचेही समोर झाले. महिला व बालकल्याण विभाग तसेच महानगरपालिका यांच्या तपासणी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला असून मोठी खळबळ माजली आहे.
मात्र अर्ज केलेल्या या 6 जणांना आधार कार्ड द्वारे कोणतेही लाभ मिळणार नाही, असं संबंधित विभागाने नमूद केलं आहे. तसेच त्या सर्वांना नोटीस बजावण्यात आली असून त्या सहाही जणांकडून खुलासा मागवण्यात आला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणीचा अर्ज भरणारे हे सर्वजण अल्पवयीन आहे.त्यांच्याविरोधात आता काय कारवाई येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यापूर्वीही झाली फसवणूक
लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार अथवा फसवणूक होण्याची ही काही पहिलीच घटना नाहीये. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याची प्रकरणे याधीही समोर आली आहेत. यापूर्वी संभाजीनगरच्या कन्नडमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं अर्ज सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 12 भावांनी लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मवर महिलांचे फोटो लावून फॉर्म भरल्याचं उघडकीस आलं होतं.
तर तत्पूर्वी घरी बसून खोटी कागदपत्र देवून साताऱ्यातील एका महाभागानं 78 हजार रुपये लाटले होते. बायको एकच मात्र तिच्या नवरोबानं तिचे वेगवेगळे ड्रेस, वेगवेगळी हेअरस्टाईल, मेकअप करुन २६ पासपोर्ट 26 काढून घेतले, याच 26 पासपोर्टफोटोंसोबत विविध 26 महिलांचे आधार कार्ड जोडून अर्ज करण्यात आला. त्या महिलांच्या आधार कार्डसोबत स्वतः मोबाईल नंबरही जोडून घेतला. धक्कादायक म्हणजे हे सव्वीसच्या 26 अर्ज मंजूरही झाले. जिथं फक्त 1500 च्या हिशोबानं 2 महिन्यांचे 3 हजार जाणं अपेक्षित होतं, तिथं 78 हजार रुपये गेले.
तिसरा हप्ता कधी ?
लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात 15 ऑगस्टनंतर जमा झाले. आता तिसरा हप्ता या महिना अखेर देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांनी दिला होता इशारा
दरम्यान अजित पवार यांनी खेडमध्ये लाडकी बहीण योजनेचे चुकीच्या पद्धतीनं पैसे लाटणाऱ्यांना इशारा दिला होता. चुकीच्या पद्धतीनं पैसे लाटल्यास कारवाईचा बडगा दाखवणार असल्याचं अजितदादांनी म्हटलं होतं. तरीही अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेत फसवणूकीचेगैरप्रकार घडतच आहेत.