देशभरात यंदा मान्सून चांगलाच बरसला. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये सरसरीपेक्षा जास्त पाऊस झाला. हवामान विभागाने मान्सूनसंदर्भात वर्तवलेला अंदाज खर ठरला. आता मान्सूनने काही राज्यांमध्ये परतीची वाटचाल सुरु केली आहे. राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणामधून २४ रोजी सप्टेंबर रोजी मान्सून परतला असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी X च्या माध्यमातून दिली. तसेच आगामी तीन, चार दिवस राज्यात पाऊस असणार आहे. अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे.
पुढील दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. वातावरणातील अनुकूल घडामोडीमुळे सक्रिय झालेल्या पावसाने बुधवारीसुद्धा पुणे शहरात हजेरी लावली होती. शहराच्या बहुतांश भागात अन् मंगळवारी मुसळधार पाऊस पडला. आता अजून पुढील दोन दिवस पावसाचा मुक्काम कायम राहणार आहे. यामुळे पुणे शहराला ऑरेंज अलर्ट आणि जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.
बीडमधील परळी तालुक्यात मध्यरात्रीपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. सर्वदूर पडणाऱ्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मागील आठवडाभरापासून पावसाने ओढ दिली होती. मात्र दोन दिवसांपासून तालुक्यात सर्व दूर मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश सर्वच पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून उकाड्यापासून त्रास सहन करत असलेले नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे रब्बी पिकाला फायदा होणार आहे. बुलढाणा – नागपूर या महामार्गावरील रोहना गावाजवळील रोहना नदीला पूर आला आहे. यामुळे या ठिकाणी वाहतूक 2 तासांपासून खोळंबली आहे.
लातूर जिल्ह्यात आलेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांसह नागरी वस्तींमध्ये मोठं नुकसान झाले आहे. लातूर शहरातल्या अनेक घरांमधे पाणी घुसले आहे. विवेकानंदपुरम, हाके नगर, तुलसी सोसायटीमध्ये पाणी घुसल्याने असंख्य वाहने पाण्याखाली आली आहेत. नंदुरबार जिल्ह्यात पावसाची संततधार आणि वातावरणात बदल होत असल्यामुळे सोयाबीन पिकावर येलो मोज्यक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. नंदुरबार जिल्ह्यात 20 हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे.