भारतीय उद्योगक्षेत्राचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील चेहरा असणाऱ्या रतन टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. रतन टाटा यांनी एक व्यक्ती आणि उद्योजक म्हणून जगण्याचे अनेक नवे मापदंड घालून दिले आहेत. त्यांच्या निधनानंतर सामाजिक, राजकीय आणि उद्योग क्षेत्रातून शोकाकूल प्रतिक्रिया उमटत आहेत. मुंबई ही रतन टाटा (Ratan Tata) यांची कर्मभूमी. टाटा घराण्यातील इतर व्यक्तींप्रमाणेच रतन टाटा यांचाही मुंबईशी खास ऋणानुबंध होता. या पार्श्वभूमीवर रतन टाटा यांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एक ट्विट केले आहे. हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई पोलिसांच्या क्रिएटिव्ह पद्धतीच्या ट्विटसची अनेकदा चर्चा होत असते. आतादेखील रतन टाटा यांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेले ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या ट्विटमध्ये एक प्रतिमा तयार करण्यात आली आहे. टाटा उद्योगसमूहाचे भलेमोठे चिन्ह आणि त्यावरुन बाहेर चालत जाणारा व्यक्ती प्रतिमेमध्ये दाखवण्यात आला आहे. त्या प्रतिमेच्या खाली Tata, Legend असे लिहण्यात आले आहे. तर या ट्विटसोबत India lost its RATAN अशी कॅप्शन लिहण्यात आली आहे.
रतन टाटा यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. दोन दिवसांपूर्वीच रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. परंतु, त्यानंतर रतन टाटा यांच्याकडून प्रसिद्धीपत्रक जारी करत माझी प्रकृती व्यवस्थित असून मी रुग्णालयात काही वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, बुधवारी रतन टाटा यांचा प्रकृती खालावत गेली आणि रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांचे पार्थिव सध्या कुलाबा येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले आहे. यानंतर सर्वसामान्यांना त्यांचे अंत्यदर्शन घेता यावे, यासाठी रतन टाटा यांचे पार्थिव नरिमन पॉईंट येथील एनसीपीए येथे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. यानंतर वरळी येथील स्मशानभूमीत रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.