राज्यात मागील आठवड्यात थंडी वाढली होती. आता या थंडीला ब्रेक लागला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील थंडी गेली आहे. परंतु पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरात आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार आहे. यामुळे राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. उत्तरेकडून येणारे थंड कोरडे वारे व अरबी समुद्रातून येणारी आर्द्र हवेमुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता जेष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर कमी झाला आहे. राज्यात २५ आणि २६ डिसेंबरला ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळे थंडीचा जोर ओसरणार आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान वाढणार आहे. तसेच २६ ते २८ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानंतर वर्षाअखेरीस म्हणजे सोमवार ३० डिसेंबरपासून राज्यात थंडी वाढणार आहे.
हलक्या पावसाचा अंदाज
राज्यात गेले काही दिवस कडाक्याची थंडी पडली होती. राज्यातील काही शहरांचे तापमान पाचे ते अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. परंतु आता वातावरणात बदल झाला आहे. वातावरणातील हा बदल पश्चिमी विभोक्ष (वेस्टर्न डिस्टर्बन्स)मुळे होत आहे. त्यामुळेच २६ डिसेंबरपासून हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी २९ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २८.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
थंडी कमी झाल्याने पर्यटनचा आनंद
आता सरत्या वर्षाचा शेवटचा आठवडा आहे. नाताळमुळे सलग सुट्ट्या मिळाल्या आहेत. त्यातच थंडीचा जोर कमी झाला आहे. त्यामुले अनेक जण सहकुटुंब पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. राज्यभरातील सर्वच पर्यटन स्थळावरती नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमधील राधानगरी धरण परिसरात बोचऱ्या थंडीचा सामना करत पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटत असताना पाहायला मिळत आहेत.