वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीच्या दृष्टीने महत्वाच्या सामन्यात भारताला पहिल्याच दिवशी धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाला नवख्या आणि तरुण सॅम कोनस्टासने चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी उस्मान ख्वाजासोबत ८९ धावांची भागीदारी केली. तसेच पदार्पणाच्या सामन्यातच ६० धावा केल्या. सॅम कोनस्टासने ६५ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६० धावा केल्या. यावेळी त्याने वेगवान गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. खासकरून जसप्रीत बुमराहला दोन षटकार ठोकत आपला हेतूही स्पष्ट करून दाखवला. यामुळे गोलंदाजांसोबत इतर भारतीय खेळाडूही त्याची फलंदाजी पाहून वैतागल्याचं दिसलं. यावेळी विराट कोहलीनेही आपला आक्रमक अंदाज दाखवून दिला. सॅम कोनस्टासला डिवचण्याची संधी सोडली. यावेळी सॅम कोनस्टास आणि विराट कोहली यांच्यात शाब्दिक चमकमकही झाली. जसप्रीत बुमराह संघाचं ११ वं षटक टाकण्यासाठी मैदानात आला होता.
कोनस्टास ३८ चेंडूत २७ धावा करून खेळत होता. यावेळी पहिल्याच चेंडूवर कोनस्टासने चौकार मारला. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव गेला आणि तिसऱ्या चेंडूवर दोन धावा काढल्या. यावेळी विराट कोहली आणि सॅम कोनस्टास यांच्यात वाद झाला. कोहली त्याच्या बाजूने जात असताना त्याचा धक्का कोनस्टासला लागला. त्यामुळे कोनस्टास चांगलाच संतापल्याचं दिसलं. त्याला अशी कृती आवडली नाही. त्यानंतर त्याने कोहलीला प्रत्युत्तर दिलं. त्यांच्यातील वाढता वाद पाहता पंचांनी धाव घेतली आणि प्रकरण शांत केलं.
कोनस्टासने त्यानंतरही आपली आक्रमक खेळी सुरु ठेवली. खेळपट्टी फिरकीला नंतर मदत करणारी आहे. त्यामुळे वेगवान मारा निष्फळ ठरल्यानंतर रवींद्र जडेजाच्या हाती चेंडू सोपवला. रवींद्र जडेजाने कोनस्टास नावाचं प्रकरण संपवून टाकलं. कोनस्टासला पायचीत करत तंबूचा रस्ता दाखवला. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी पाहता आरामात ४०० च्या घरात धावसंख्या जाईल असं वाटत आहे. त्यामुळे भारताला हा सामना वाचवण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे. खासकरून फलंदाजांना साजेशी कामगिरी करावी लागणार आहे.