Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रपत्नी-मुलाच्या आत्महत्येनं हादरला, विरहाने रडणारा पतीच आरोपी निघाला,

पत्नी-मुलाच्या आत्महत्येनं हादरला, विरहाने रडणारा पतीच आरोपी निघाला,

मुंबईत दिवसेंदिवस गुन्ह्यांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. त्यातच कांदिवली येथील एका घटनेने तर लोकांचा थरकाप उडाला आहे. पत्नी आणि मुलाने आत्महत्या केल्याने हादरलेल्या , शोकव्याकूळ होऊन रडणाऱ्या पतीच्या चेहऱ्यावरचा खोटा बुरखा फाटला आणि या मृत्यूसाठी तोच जबाबदार असल्याचे समोर आलं. एवढंच नव्हे तर ज्या मुलासाठी आणि पत्नीसाठी तो इसम गळा काढून रडत हता, त्यांनी आत्महत्या केली नाही तर त्या माणसानेच दोघांची क्रूरपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला आहे. कांदिवली पूर्वेतील या घटनेमुळे शहरातील नागरिक प्रचंड हादरले असून समता नगर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. शिवशंकर सुकंद्र दत्ता असे आरोपीचे नाव असून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिवशंकर हा कांदिवली पूर्व येथील समतानगर भागात नरसी पाड्यातील एका चाळीत पत्नी पुष्पा आणि मुलासह रहात होता. शिवशंकर हा व्यवसायाने टेम्पो चालक असून सोमवारी दुपारी तो घरी परत आला तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. बऱ्याच वेळा आवाज देऊनही पत्नीने दरवाजा उघडल्याने आपण खिडकीतून डोकावून पाहिलं, तेव्हा पत्नी आणि मुलगा दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत होते, असा दावा त्याने पोलिसांसमोर केला. दोघांच्याही मृत्यूने तो अगदी शोकाकूल झाला, विरहामुळे रडत होता.

 

असा उघड झाला गुन्हा

सुरुवातीला, आरोपीने पोलिसांना सांगितले होते की सोमवारी दुपारी 12.30 वाजता तो घरी आला होता. पण दार ठोठावल्यानंतर जेव्हा पुष्पाने दार उघडले नाही तेव्हा त्याला शंका होती. म्हणूनच, स्थानिक रहिवाशांच्या मदतीने त्याने दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला आणि पत्नी व मुलाने लटकून आत्महत्या केल्याचे दिसले. आई-मुलाला अशा दोघांनाही लटकलेले पाहून स्थानिक रहिवाशांना आश्चर्य वाटले. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली, आरोपीचीही चौकशी केली. मात्र तांत्रिक पुरावा गोळा केला असता, पोलिसांना संशय वाटला. त्यांनी आरोपीची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघड झाली. त्याच्या पत्नी व मुलाने आत्महत्या केली नव्हती तर आरोपीनेच त्यांची हत्या केल्याचे उघड झाले.

 

अनैतिक संबंधांच्या संशयावरून घेतला जीव

 

गेल्या एक वर्षापासून, शिव शंकर दत्ता हा कांदिवली येथे पत्नी पुष्पा आणि आठ वर्षांचा मुलासह रहात होता. मात्र पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय शिवशंकर याला होता. त्याच संशयातून त्याने पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली. मात्र वडिलांनी आपल्या आईला मारलं हे त्याच्या मुलानेही पाहिलं होतं, त्यामुळे शिवशंकरनेच त्याच्या पोटच्या मुलाचीही हत्या केली. त्यानंतर त्याने दोघांनीही आत्महत्या केल्याचा बनाव रचला. समता नगर पोलिसांच्या तपासात हा गुन्हा उघड झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -