माढ्यातील एका 14 वर्षांच्या मुलाने गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता नवीन वळण लागलं आहे. आपल्या मुलाने आत्महत्या केली नाही तर त्याचा खून करण्यात आल्याचा आरोप सैन्यदलात नोकरीला असलेले त्याचे वडील गणेश नष्टे यांनी केला. या प्रकरणात पोलिसांनी तपास करावा आणि न्याय द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.
सैन्यदलात असलेल्या वडिलांच्या पिस्तुलमधून गोळी मारून घेऊन मंगळवारी माढा तालुक्यातील आलेगाव येथील श्रीधर गणेश नष्टे या सातवीत शिकणाऱ्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
इंदापूर तालुक्यातील सराटी येथील शाळेत सातवीमध्ये शिकणारा श्रीधर आजारी असल्याने शाळेत गेला नव्हता. दुपारची वेळ असल्याने घरातील सर्व मंडळी शेतात कामाला गेले होते. त्याचवेळी घरात कोणी नसताना श्रीधर याने वडिलांच्या पिस्तुलने घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची घटना समोर आली होती. मंगळवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.